
वसई : वसई-विरार शहर महानगरापालिकेच्या २०२२ साठी आरक्षणाची सोडत आज विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात पार पडली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिला आणि पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या एकूण ४२ प्रभागात १२६ सदस्य निवडून येणार आहेत. यंदा ओबीसी आरक्षणाशिवाय ४२ प्रभागात त्रिसदस्यी प्रभाग रचना असल्याने प्रत्येक वॉर्डमध्ये एक किंवा दोन महिला आणि एक किंवा दोन पुरुष आहेत. मागच्या निवडणुकीत ११५ नगरसेवकांपैकी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे १०७ सदस्य संख्या होती. तर बविआ पुरस्कृत १ अपक्ष, शिवसेनेची ५, भाजपाला १ तर अपक्ष म्हणून एक मनसेचा पदाधिकारी निवडून आलेला.
एकूण ४२ प्रभागातील १२६ सदस्य संख्येत पुरुषांना ६३ जागा तर महिलांना ६३ जागा होत्या. त्यात सर्वसाधारण पुरुष गटात ५८, अनुसूचित जातीत पुरुष -२, अनुसूचित जमाती पुरुष -३ यावर आरक्षण पडलं आहे. तर सर्वसाधारण महिला गटात ५७, अनुसूचित जातीत महिला गटात -३, अनुसूचित जमाती महिला -३ असे आरक्षण पडले आहे.