Tuesday, December 3, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली

मुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली

सिंधुदुर्ग : कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली सुरु होणार आहे. मात्र या टोल वसुलीला सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. कणकवलीमधील ओसरगाव टोल नाक्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधल्या हातीवलेमध्येही उद्यापासून (१ जून) टोल वसुली सुरु होणार आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गाने ये जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच पर्यटकांना टोलवसुलीचा फटका बसणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या ६० किमी लांबी करता एम डी करीमुन्नीसा या टोल ठेकेदार कंपनीमार्फत उद्यापासून टोलवसुली सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी ओसरगाव नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येणार आहे. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे. दुचाकी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचं बहुतांशी काम पूर्ण झालं आहे. पण सर्व्हिस रस्ते अद्याप अपूर्ण आहेत. तर काही ठिकाणी महामार्गावर ठेवण्यात आलेले शॉर्ट कट मात्र जीवघेणे ठरत आहेत. गेल्या दोन दिवसात तीन ते चार ठिकाणी महामार्गावरील शॉर्ट कटने अपघात झाले.

उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाका सुरु झाल्यास वादावादी होण्याची शक्यता जास्त आहे. सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. सिंधुदुर्गवासियांकडून टोल वसुली केल्यास टोलनाका उद्ध्वस्त करुन टाकू, असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मनसेने सिंधुदुर्गातील वाहनांकडून जबरदस्तीने टोल वसुली केल्यास टोलनाक्याची तोडफोड करणार असं म्हटलं आहे.

तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लोकांची नुकसान भरपाई द्या, महामार्गावरील समस्या सोडवा आणि मगच टोल वसुली करा अशी सावध भूमिका घेतली आहे. याशिवाय सिंधुदुर्गातील वाहनांकडून टोलवसुली करायचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रक, टेम्पो चालक मालकांचा ओसरगाव टोल नाक्याविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावर उद्या वातावरण तापण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष टोल विरोधात असल्याने उद्यापासून सुरु होणाऱ्या टोल वसूली वर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -