
मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या देशात सुमारे ६० कोटी महिला आहेत. त्यातील सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. यातील फक्त १५% मुली व महिलाच सॅनिटरी पॅड वापरतात. सुमारे ८५% महिला अजूनही सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. ज्यामुळे दरवर्षी कित्येक महिलांना सर्व्हिकल कॅन्सरसारखे आजार होतात. २५% मुलींची शाळेत गैरहजेरी लागते. मासिक पाळी स्वच्छता ही काळाची गरज असून राज्य सरकारने दर महिन्याला धान्याप्रमाणे महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी वर्सोव्याच्या भाजपच्या आमदार आणि ‘ती’ फाऊडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती लव्हेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे
आमदार डॉ. लव्हेकर यांच्यातर्फे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस आणि ‘ती’ फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँकेचा ५ वा वर्धापन दिन वर्सोव्यात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळेस मासिक पाळीच्या दिवसांतील स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यासाठी Walk For Cause - रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांच्या सोबत आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक, प्रसिद्ध गायक उदित नारायण, पोलीस उपायुक्त सुनीता साळुंखे, महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ अधिकारी मेघना तळेकर, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया, प अभिनेत्री उपासना सेन तसेच या विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात सुद्धा त्यांनी देशातील महिलांनी सॅनिटरी पॅड वापरणे व महिलांसाठी स्वतंत्र शौचालय असणे किती गरजेचे आहे, याचा उल्लेख केला होता. आमदार विनायक मेटे यांनीही यावेळी आपले विचार मांडले.