Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणभाजपच्या रिफायनरी स्वागत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपच्या रिफायनरी स्वागत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रकल्पाला आडवे येणाऱ्यांनाच आडवे करा; निलेश राणेंनी दिला कानमंत्र

राजापूर (प्रतिनिधी) : भाजपच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या रिफायनरी स्वागत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यासाठी खास मुंबईतून राजापुरात दाखल झालेल्या भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आता हा प्रकल्प होणारच, अशी ग्वाही देताना या प्रकल्पाच्या आडवे येणाऱ्यांनाच आडवे करा. मी तुमच्या पाठिशी आहे, असा कानमंत्रच दिल्याने प्रकल्प समर्थकांमध्ये आणखी उत्साह पसरला आहे.

स्वागत मेळाव्यासाठी प्रकल्पग्रस्त धोपेश्वर, बारसू, गोवळसह शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह हजारो समर्थकांनी उपस्थिती दर्शवत रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजेचा नारा दिला. तालुक्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प अंमलबजावणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारची सकारात्मक चर्चा, रिफायनरी कंपनी आणि एमआयडीसीची चर्चा व बैठका, प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतचे पुढील नियोजन, प्रकल्पासाठी आवश्यक पाणी, वीज यांची सुविधा अशा अनेक बाबींवर आता नियोजन आणि बैठका होत असून हा प्रकल्प या परिसरात राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचे या प्रकल्पाला प्रारंभीपासूनच समर्थन आहे, नव्हे भाजपनेच हा प्रकल्प आणलेला आहे.

त्यानंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेबरोबरच शिवसेनेनेही आता या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांनी केंद्र शासनाला लेखी पत्र देऊन हा प्रकल्प राबविण्यासाठी धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात १३,००० हजार एकर जागा उपलब्ध करून देऊ, असे पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मात्र तरीही शिवसेना खासदार विनायक राऊत हे आपले विरोधाचे तुणतुणे वाजवतच आहेत. मात्र भविष्यातील विकास, बेरोजगारांना काम आणि आर्थिक उन्नत्ती यासाठी आता काही झाले तरी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे असा निर्धार तालुकावासीयांनी केला आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने निलेश राणे यांच्या उपस्थितीत रिफायनरी स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राजापुरातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली व हा मेळावा यशस्वी केला.

रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान

राजापुरातील या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या ग्रामीण भागातील काही महिलांचा या मेळाव्यात निलेश राणे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या महिलांनी प्रारंभी रिफायनरीचे समर्थन केले म्हणून त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र तरीही न डगमगता रिफायनरी समर्थनाच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेत या महिलांनी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे असा नारा दिला. या सर्व महिलांचा राणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -