नवी मुंबई (प्रतिनिधी) : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेने श्वान नियंत्रण उपक्रम सुरू केला आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत तब्बल ७ हजार ५६९ कुत्री पकडली असून त्यामधील १ हजार ३६२ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. तर ६ हजार २२४ कुत्र्यांवर उपचार करण्यात आले आहेत.
शहरातील जवळपास ९० टक्के भटक्या कुत्र्यांची शस्त्रक्रिया करण्यात यश आले असून श्वान नियंत्रणाचा नवी मुंबई पॅटर्न राज्यभर राबविण्याची मागणी होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक महानगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. रात्री अनेक रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत पाहावयास मिळते. कुत्रे मागे लागल्यामुळे मोटरसायकलचे अपघात होण्याच्या घटनाही होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने २००६ पासून श्वान नियंत्रण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
इन डिफेन्स ऑफ ॲनिमल संस्थेला हे काम देण्यात आले होते. कोपरीमधील केंद्र मोडकळीस आल्यामुळे सद्यस्थितीमध्ये तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर तात्पुरत्या स्वरूपात श्वान नियंत्रण केंद्र उभारून तेथे हे काम सुरू केले आहे. २०१४ पासून श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात आली आहे.
श्वानाना सुरक्षितरीत्या पकडण्यास अनेक अडचणी येत असतात. तरीसुध्दा आमच्या पथकातील कर्मचारी यशस्वी होतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यावर कार्यवाही करण्यास यश आले आहे. यापुढेही ही कार्यवाही चालूच राहील.
-डॉ. श्रीराम पवार, उपायुक्त तथा पशु वैद्यकीय अधिकारी, पालिका