घन:श्याम कडू
उरण : उरण तालुक्यात सीआरझेड कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करून प्रकल्प उभारले आहेत. त्यापैकी कोणावरही सीआरझेडची कारवाई न करता एखाद्या शेतकऱ्याने आपल्याच जमिनीवर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना संबंधित अधिकारी वर्गाकडून संबंधित शेतकऱ्यांना सीआरझेड कायद्याचा धाक दाखवून व्यवसाय करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून ते लवकरच पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे दाद मागणार आहेत.
प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा धाक नसल्यावर मस्तवाल प्रशासकीय अधिकारी सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीनुसार पिडत असल्याची गंभीर माहिती हाती आली आहे. उरणच्या पूर्व भागात अनेक कंपन्यांनी सीआरझेड कायद्याची ऐसी की तैसी करून ठेवलेली असताना त्यांच्यावर कारवाई करताना कुचराईचे धोरण घेणाऱ्या सीआरझेडच्या अधिकारी वर्गाने आता सामान्य शेतकऱ्यांना मात्र पिडायाला घेतले असल्याचे समोर आले आहे.
नैसर्गिक पाणी निचरा नाल्यांवर अतिक्रमणे करणारे बेधडक आपले प्रकल्प वसवून महिन्याकाठी लाखोंची कमाई करीत असतांना सामान्य शेतकऱ्याने त्याच्या नैसर्गिक पाणी निचरा शेजारी असलेल्या वडिलोपार्जित शेतात एखादा प्रकल्प राबवून आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवायचा, तर सीआरझेडचे अधिकारी अशा छोट्या-छोट्या आस्थापनांना भेटी देऊन तुमच्याकडून सीआरझेडचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे, असे सांगून शेतकरी राबवित असलेल्या प्रकल्पातील अर्ध्याअधिक जमिनीवर थेट आखणी करून ‘लक्ष्मण रेखा’ आखत असल्याची माहिती हाती आली आहे.
बड्या कंपन्यांनी सीआरझेड कायद्याची चिरफाड करीत आपले प्रकल्प राबविले असल्याची अनेक उदाहरणे उरणच्या पूर्व भागात आहेत. कांदळवनांवर भराव करूनही काहींनी आपले प्रकल्प राबविले आहेत. नैसर्गिक पाणी निचरा नाल्यांवर अतिक्रमणांबरोबरच काहींनी आपल्या कार्यालयीन इमारती ही उभ्या केल्या आहेत. नैसर्गिक पाणी निचरा नाल्यांना अगदी खेटून कंपन्यांनी आपल्या प्रकल्पाच्या संरक्षक भिंती बांधल्याची ही अनेक उदाहरणे आहेत.