शिबानी जोशी
संघाच्या देशभरात पसरलेल्या विविध संघटना आणि संस्था शिक्षण, आरोग्य, आपत्तीग्रस्तांना मदत अशा कार्याबरोबरच विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राष्ट्रीय विचार, देशभक्ती जागवण्याचे काम करत असतात. त्यामध्येच पुस्तक, वृत्तपत्र प्रकाशन, विविध प्रकारच्या व्याख्यानमालांचाही अंतर्भाव होतो.
सामाजिक उपक्रमाची सुरुवात करणे सोपे असते. पण सातत्य टिकवणे अवघड असते. सुरुवातीला उत्साह असतो. नावीन्य असते. त्यातून दृश्य परिणाम होण्याची अपेक्षा असते. पण त्यातले नावीन्य संपले की, मग उपक्रम थांबतात असे बऱ्याच वेळा पाहायला मिळते. व्याख्यानमाला किंवा प्रबोधन हा तर आणखी अवघड असणारा उपक्रम! थेट परिणाम खचितच दिसणारा हा उपक्रम. त्यामुळे अशा उपक्रमाला कार्यकर्त्यांची नितांत गरज असते. अर्थात संघ आणि संघाच्या विचारांची विविध क्षेत्र ही अशा कार्यकर्त्यांची खाणच आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अशा व्याख्यानमाला आयोजित होत आहेत आणि लोकांचाही रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद त्याला मिळत आहे. अहमदनगरच्या काही कार्यकर्त्यांना असाच व्याख्यानमाला उपक्रम सुरू करावा वाटला आणि त्यांनी १२ वर्षं यशस्वी राबवत तपपूर्तीच्या मार्गावर आणून ठेवला आहे.
कोरोनाची दुःखद दोन वर्षे पण उपक्रम बंद पडला नाही. आभासी पद्धतीने ही व्याख्यानमाला कोरोना काळात संपन्न झाली. स्वर्गीय ग. म. मुळे हे नगर जिल्ह्यातील एका पिढीचे प्रतिनिधित्व करणारे स्वयंसेवक. त्या वेळी संपूर्ण विरोधी वातावरणात, हाताशी अल्प साधने जवळ असताना आणि लोकांकडून उपेक्षा, कुचेष्टा होत असतानाही नेटाने प्राप्त परिस्थितीमध्ये काम करत राहिलेले कार्यकर्ते. त्यांचे नाव देऊन नगरमध्ये व्याख्यानमाला सुरू झाली. मुळे यांचे नाव दिले गेले असले तरी यश, अपयश, कीर्ती, लाभ, स्तुती, निंदा, जय- पराजय यांच्यापलीकडे जाऊन स्थितप्रज्ञ वृत्तीने काम करणारी संघातील एक मोठी फळी नगरमध्ये आहे. त्या सर्वांना विनम्र भावाने श्रद्धांजली वाहण्यासाठी हा व्याख्यानमाला उपक्रम करावा असे वाटत होते आणि याची परिणती ग. म. मुळे स्मृती व्याख्यान मालेच्या रूपात झाली. ही विचारांची पालखी वाहणारे आजचे अनेक कार्यकर्तेही केवळ भोई म्हणून यासाठी काम करत आहेत.
सुनील देवधर, श्रद्धेय गोविंदेव गिरी महाराज, कुलगुरू मदन गोपाळ वार्ष्णेय, अनिरुद्ध देशपांडे, गिरीश कुबेर, डॉक्टर अशोकराव कुकडे, विनायकराव देशपांडे, सुरेश चव्हाण यांनी या व्याख्यानमालेत व्यासपीठ भूषवले आहे. साहित्यिक अरुणाताई ढेरे, प्रवीण दवणे, सदानंद मोरे, सौ. संगीता बर्वे, वीणाताई देव, नीलिमा किराणे या साहित्यिकांनी साहित्याचे रंग या व्याख्यानमालेत भरले आहेत. चारुदत्त आफळे, बालाजी चिरडे, विक्रम एडके अशांनी सावरकर मांडलेत, तर नगरच्या मातीतून मोठे झालेले जयंत कुलकर्णी, अजित बिडवे यांनी पण योगदान दिले. नूपुर शर्मा, विनयजी पत्राळे, संजय मालपाणी, विनायकराव गोविलकर, माधवराव चितळे यांनी या व्याख्यानमालेची वैचारिक उंची वाढवली आहे. वनवासी जीवनाचे विविध पैलू कै. सुनील देशपांडे, चैत्राराम पवार, ठमाताई पवार, कुंडलिक पारधी, नरेंद्र पेंडसे, संजय कुलकर्णी यांनी उलगडून दाखवलेत. किरण शेलार, शेकटकरजी, प्रदीप रावत, मिलिंद कांबळे यांच्यामुळे विषयाचे वैविध्य वाढले आहे. वनवासी कल्याण आश्रम, संस्कार भारती, भारत भारती, ईशान्यकडील कार्य, जैवविविधता, छात्रावास अशा अनेक विषयांवर काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींची व्याख्याने झाली आहेत. यंदा व्याख्यानमालेचे तपपूर्ती वर्ष आहे, त्यानिमित्ताने भरगच्च वैचारिक व्याख्यान करायचे ठरवले. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली, चांगलं काम ठरवलं की, अनेक हात पुढे येतात. त्याचप्रमाणे नगरमधल्या भारत भारती, संस्कार भारती, राष्ट्रहित संवर्धक मंडळ या संस्था यंदा मदतीसाठी पुढे आल्या आणि यंदा २५ ते २९ मे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. यंदा “उद्याचा महाराष्ट्र” या विषयावर आशीष शेलार, “अज्ञात स्वातंत्र्यसंग्राम “या विषयावर राहुल सोलापूरकर, “गायकी ते पर्यावरण कार्यकर्ती” हा प्रवास अनुराधा पौडवाल, “स्वातंत्र्यवीर सावरकर, आक्षेप आणि वास्तव” यावर अक्षय जोग आणि भारताचा सांस्कृतिक राष्ट्रवाद यासंबंधी डॉक्टर सुधांशू त्रिवेदी यांनी अतिशय प्रगल्भ अशी राष्ट्रीय विचारांची मांडणी केली आणि अहमदनगरकरांना वैचारिक खाद्य पुरवलं. यावेळी स्मरणिका काढून संग्राह्य असा दस्तऐवज लोकांसमोर मांडण्यात आला तसेच राष्ट्रीय विचाराच्या पुस्तकाची विक्री व्यवस्था केली गेली.
सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून यापुढे केवळ वर्षभरातून एक व्याख्यानमालाच नाही तर “विमर्श व्यासपीठ” या नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार करून त्या योगे विविध उपक्रम राबवण्याची व्याख्यानमाला समितीची योजना आहे.