Tuesday, July 1, 2025

मंकीपॉक्स संदर्भात केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

मंकीपॉक्स संदर्भात केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी मंकीपॉक्स रोगाच्या व्यवस्थापनासंबंधी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे देशात या आजाराचे एकही रूग्ण आढळून आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंकीपॉक्सच्या जगभरातील रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.


संशयित रुग्ण आढळल्यावर त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवले जातील, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे. हे नमुने एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाअंतर्गत पाठविले जातील. तसेच अशी प्रकरणे संशयास्पद मानली जातील, ज्यामध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ज्याचा गेल्या 21 दिवसांत मंकीपॉक्स प्रभावित देशांमध्ये प्रवासाचा इतिहास आहे. त्याशिवाय ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे अशी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास अशा रुग्णाला हॉस्पिटलच्या आयसोलेशन रूममध्ये किंवा घरातील वेगळ्या खोलीत ठेवण्यात येईल. रुग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालावा लागेल. रुग्णाच्या अंगावरील सर्व पुरळ बरे होईपर्यंत आयसोलेश चालू राहील. यासोबतच संशयित किंवा रुग्णाचे संपर्क ट्रेसिंग केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, यापूर्वी म्हणजेच २० मे रोजी केंद्र सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांवर आणि प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने विमानतळं, बंदरे यांचा समावेश होता. याशिवाय दक्षिण अफ्रिकेतून भारतात दाखल होणाऱ्या आणि ज्या प्रवाशांमध्ये या आजाराची लक्षणं दिसून येत आहे अशा प्रवाशांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Comments
Add Comment