उज्ज्वला आगासकर
ज्या काळात मुलींना शाळेत जाऊ देणे व त्यांच्या बुद्धीचा विकास मान्य करणे हे समाजाला कठीण वाटत असे, त्याच काळात स्वतःला मिळालेल्या संधीचा समर्थपणे उपयोग करून इतरांच्या सुखसोयी वाढविणारी, अडचणी दूर करणारी राज्यकर्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर. राजगादीवर असलेल्या पतीच्या निधनानंतर त्यांना अनपेक्षितपणाने राजगादीची जबाबदारी सांभाळावी लागली, मात्र यामुळे हबकून न जाता त्यांनी आपली कामे अपेक्षेपलीकडे यशस्वी करून दाखवली.
मुंबईहून रस्त्याने नाशिकला जाताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नांव “थळ घाट” असे आहे. घाट चढताना डाव्या बाजूस दरी आणि उजव्या बाजूस डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार, टोपली उलटी ठेवल्याप्रमाणे दगडी बांधकाम दिसते. असे बांधकाम कधी राहत्या घराचे किंवा मंदिराचे असत नाही, तर मग हे काय असेल? असा प्रश्न पडत असे. त्यामुळे एकदा तेथे थांबून बांधकामाभोवती असलेल्या दहा- बारा महिलांना तेथे जाऊन विचारले, तेव्हा कळले की, ती एक मोठी जवळजवळ चाळीस फूट व्यासाची विहीर असून, आत कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे. विहिरीत काठोकाठ स्वच्छ पाणी भरलेले होते.
आजदेखील त्या डोंगरात वरच्या बाजूला असलेल्या चार वस्त्यांमधील महिला येथूनच पाणी भरतात. ही विहीर आणि हे छप्पर या जंगलामध्ये कुणी बांधले? तर या घाटाची जी पूर्वी पायवाट होती, त्या वाटेने चढून प्रवास करणारे वाटसरू आणि यात्रेकरू यांना वाटेत विसावा घेता यावा म्हणून ही विहीर अहिल्याबाई खंडेराव होळकर (१७२५-१७९५) यांनी बांधली. अहिल्याबाईंचे यजमान खंडेराव यांचे अकाली निधन झाले, तेव्हा त्यांना सती जाऊ न देता, राज्याचा सारा कारभार त्यांचे सासरे मल्हारराव खंडोजी होळकर (१६९३-१७६६) यांनी सुनेच्या हाती विश्वासाने सोपवला आणि या सुनेने त्या विश्वासाला तडा जाऊ न देता, राज्य उत्कृष्टपणे सांभाळून रयतेचे आशीर्वाद मिळवले.
दरसाल वैयक्तिक खर्चासाठी राणीला मिळणारी चौदा लाख रुपयांची रक्कम (ज्या काळात एका रुपयांत एक पोतेभर धान्य मिळत असे) देखील या राणीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांतील अनेक तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे आणि यात्रेकरूंच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधण्यासाठीच वापरली.
वास्तविक त्यांना ही संधी देणारे त्यांचे सासरे मल्हारराव यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी विश्वास ठेवला नसता, तर अहिल्याबाईंच्या कर्तबगारीला कुठून वाव मिळाला असता? आपल्या कर्तबगार पूर्वजांचे आस्थेने स्मरण करण्याची कृतज्ञता बाळगणे आवश्यक असते.
कसारा घाटामधील अहिल्याबाईंच्या या विहिरीकडे जनतेचे आणि शासनाच्या पर्यटन विभागाचे लक्ष वेधण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करीत असते. विहिरीबद्दल माहिती देणारा फलक तयार करून तेथे तो लावणे पर्यटन खात्याला कठीण नाही. मात्र अद्यापि तशी हालचाल नाही️. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाईंची जयंती आहे. त्यानिमित्ताने या निःस्वार्थी राणीला कृतज्ञतेचे वंदन करण्याचा ‘‘प्रहार’’ च्या माध्यमातून हा प्रयास आहे.