
कीर्ती केसरकर
नालासोपारा : वसईतील प्रसिद्ध समुद्रकिनारे म्हणजेच नवापूर राजवडी आणि कळम या ठिकाणी अनधिकृत कॅफे आणि हॉटेल वाढत चाललेले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या हॉटेल्स आणि कॅफेवर कारवाई करण्यात आली होती. पण पुन्हा हे कॅफे आणि हॉटेल्स पुन्हा असे सुरू झाल्याने नेमका यांना कोणाचा आशीर्वाद आहे. तसेच यांच्या बांधकामांमध्ये कोणा कोणाचा हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वसईतील नवापूर, रजोडी आणि कळंब समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्स आणि कॅफे हे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर देखील काही दिवसातच हे हॉटेल्स आणि कॅफे सुरू करण्यात आले. तर नेमका यामध्ये कोणाकोणाचा भ्रष्टाचार सुरू आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाला याची माहिती असताना देखील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्याच बरोबर पर्यावरण विभागाचा याकडे लक्ष जात नाही.
झाडे कापून बेकायदा माती भराव करून हे हॉटेल आणि कॅफे सुरू करण्यात आले होते. तर पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना देखील बिनधास्तपणे सर्व नियम मोडून हे कॅफे आणि हॉटेल सुरू आहे. याच बरोबर या ठिकाणी अनधिकृतरित्या दारूचे सेवन केलं जात आहे, तसेच दारू विकली जात आहे इतके मोठे गुन्हे घडत असताना पोलीस प्रशासन ही गप्प आहे. तर पालिका प्रशासन यावर कारवाई करत नाही तोपर्यंत पोलिस प्रशासन यात हात घालणार नाही असे उत्तर आता पोलिसांकडून दिल जात आहे. नेमकं यामध्ये कोणाची मुख्य भूमिका आहे तसेच या हॉटेल ना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
फक्त जेवण आणि दारूचा नाही तर याठिकाणी अवैधरित्या लॉजिंग आणि बोर्डिंग देखील सुरू करण्यात आले आहे. तर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून लॉजिंग आणि बोर्डिंग कोणतेही परवान्याशिवाय चालू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना कागदपत्रे नसताना तसेच घरपट्टी नसताना याठिकाणी लाईट देखील पुरवली जात आहे. म्हणजे यामध्ये महावितरण विभाग आणि पालिका प्रशासन हे देखील समाविष्ट आहेत असे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कारवाई देखील झाली. परंतु, पुन्हा हे हॉटेल आणि कॅफे जोमाने सुरू झाले देहविक्री, दारूविक्री आणि अनधिकृत बांधकाम अशा मोठमोठ्या गोष्टी असतानादेखील पालिका आणि पोलीस प्रशासन तसेच महसूल विभाग हे डोळे झाकून फक्त बघत राहिलेला आहे. भ्रष्टाचाराने हात बरबटलेले असल्याने अशा गुन्ह्यांना आता वाढ मिळत आहे आणि ही वाढ या मुख्य विभागांकडून केली जात आहे. नागरिक या विभागांकडे सुरक्षेच्या दृष्टीने पाहत आहे. परंतु, हे सर्व विभाग याकडे दुर्लक्ष करून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत आहेत या कॅफे आणि हॉटेल्स मध्ये चालणार हे प्रकार कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.