नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यात कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय अनेक सेवासुविधांपासून आजही वंचित आहे. ३० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या ग्रामीण रुग्णालयात पूर्ण क्षमतेने बेड उपलबध नाहीत. रुग्णालय सुरू झाल्यापासून अद्याप वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयाला मिळालेला नाही. कशेळे गावातील चार ग्रामस्थांनी २४ गुंठे जमीन शासनाला देऊ केली आणि १९७४ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले. रुग्णांची गर्दी लक्षात घेऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर १९८६ मध्ये ग्रामीण रुग्णालयात केले. शासनाने त्यावेळी घोषित केलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय आजही कागदावरच आहे. इमारती बांधण्यात आली त्यावेळी २० बेडचे रुग्णालय सुरु झाले ते आजही २० बेडचेच आहे.
ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली त्यावेळी रुग्णालयात चार एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर आणि मेडिकल सर्जन दर्जाचा वैद्यकीय अधीक्षक अशा पोस्ट मंजूर होत्या. मात्र आजतागात या ग्रामीण रुग्णालयाला मेडिकल सर्जन दर्जाचा वैद्यकीय अधीक्षक मिळाला नाही. वैद्यकीय अधिकारी दर्जाचे डॉक्टरांवर वैद्यकीय अधीक्षक यांची प्रभारी जबाबदारी आजही कायम आहे. रुग्णालयाचा भार दोन वैद्यकीय अधिकारी वाहत आहेत.
दोन रुग्णवाहिका मंजूर असून त्यापैकी एक रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत अनेक वर्षे गोडाऊन मध्ये पडून आहे. शासनाने गतवर्षी कोविड काळात कशेळे ग्रामीण रुग्णालयासाठी एक रुग्णवाहिका दिली,पण त्या रुग्णवाहिकेसाठी चालक दिला नाही. त्यामुळे चालकाविना रुग्णवाहिका धूळ खात पडून आहे. कशेळे ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्री रोगतज्ञ डॉक्टर नसल्याने गरोदर महिला प्रसूतीसाठी आल्यानंतर तेथे सीझर करण्याची वेळ आली तर भूलतज्ञ देखील उपलब्ध नाही. रुग्णालयात जे दोन डॉक्टर सेवा देत आहेत,त्यातील एक डॉक्टर हे हाडांचे तर दुसरे बालरोगतज्ञ आहेत. हाडांचे डॉक्टर डॉ. विक्रांत खंदाडे यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक पदाची जबाबदारी असून त्यांच्याकडून नियमित शस्त्रक्रिया सुरु असतात.
कशेळे ग्रामीण रुग्णालयात टेक्निशयन यांची उपलब्धता असल्याने प्रयोगशाळेत सर्व चाचण्या होतात. सोनोग्राफी आणि सर्व प्रकारचे एक्स रे यांची सुविधा देखील सुस्थितीत आहे. सर्व आजारांवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयात शासनाच्यावतीने वर्षातून दोनवेळा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणा यांच्याकडून आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जातात. मात्र आदिवासी तालुका असलेल्या कर्जत तालुक्यासाठी आणि आदिवासी भागात सुरु झालेले कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय २० बेड क्षमतेचे सुरु असून उर्वरित १० बेड लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही.