- सूर्या नदी पार करताना तराफा, नावेचा आधार
- पावसाळ्यात विद्यार्थी, नागरिकांचे हाल
- कायमस्वरूपी पूल बांधण्याची गरज
कासा (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील कोसेसरी भवाडी येथील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून सूर्या नदीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी नागरिक करत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता काही उपाययोजण्याची मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे.
कोसेसरी गावाजवळून सूर्या नदी वाहते. ही नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. त्यामुळे कोसेसरी भवाडी आणि लगतच्या तीन-चार गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी कासा येथे यावे लागते. शाळेत जाण्यासाठी मुलांना तराफ्यात किंवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या नदीवर पूल व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पण याकडे कुणीच लक्ष दिले नाही, असे ग्रामस्थ सांगतात.
कासा किंवा तलवाडा येथे येण्यासाठी दुसरीकडून १५ ते २० किलोमीटर वळसा घालून यावे लागते. त्यात तेथून प्रवासी वाहनांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थी या नदी पात्रातून प्रवास करतात. त्यांचा प्रवास धोकादायक असल्याचे पालक सांगतात. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा प्रवास अशाच प्रकारे सुरु असून रोज ३५ ते ४० शाळकरी विद्यार्थी असा प्रवास करतात. त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकरी करत आहेत.
अनेक वर्षापासून कोणतेही काम सुरू झाले नाही. या भागात अनेक नेते, पदाधिकारी पाहणी करतात. काही सामाजिक संस्था देखील आल्या. त्यांनी लाईफ जॅकेट, नदी किनारी पायऱ्या यांची मदत केली. पण येथे कायमस्वरूपी पूल उभारला गेला तरच हा प्रश्न सुटणार आहे.
कोसेसरी भवाडी येथील शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना कासा येथे येण्यासाठी दररोज सूर्या नदीतून लाकडी होडीचा उपयोग करून जावे लागते. येथे कायमस्वरूपी पूल बांधावा यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी या परिसरातील अनेक ग्रामपंचायतीतर्फे ठराव दिलेले आहेत. प्रशासनाने लवकर पूल बांधून द्यावा.-शैलेश करमोडा, जि. प. सदस्य, ओसरवीरा गट