
कोल्हापूर : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूर दौऱ्यावर असताना ते करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले. दर्शन घेऊन झाल्यानंतर भाऊसिंगजी रोडच्या दिशेने जात असताना आव्हाडांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. चिंचोळ्या भाऊसिंगजी रोडवर वाहतूक कोंडीत जितेंद्र आव्हाडांच्या वाहनांचा ताफा अडकल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. त्यामुळे पोलिस तत्परतेने वाहने बाजूला करत होते. याचवेळी एका वाहनधारकाला बाजूला करताना एका पोलिसाने वाहनधारकाला थेट कानशिलात लगावली. ज्या वाहनधारकाला कानशिलात लगावली तो वाहनधारक सुद्धा गर्दीत अडकला होता, त्याची कोणतीही चूक नसताना मंत्र्यांच्या ताफ्याला वाट काढताना संतापलेल्या पोलिसाने त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून सोशल मीडियावर त्या पोलिसाविरोधात कारवाईची मागणी होत आहे.
https://twitter.com/MrWabs/status/1531156140364824577
मंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाट मोकळी करण्यासाठी पोलिसाने दिलेली कानशिलात चर्चेची विषय ठरली आहे. या प्रकरणात आता कानशिलातचा प्रसाद देणाऱ्या पोलिसावर कारवाई होईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. उभय नेत्यांची शासकीय विश्रामगृहात भेट झाली. या भेटीवेळी जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचा हात उंचावत आमचं ठरलंय असे म्हणाले. त्यांच्या या वाक्यावरून सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण संजय राऊत यांनी आपल्या भाषणामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांना लक्ष्य केले होते. चाव्या आमच्याकडे आहेत असे राऊत म्हणाले होते. त्यामुळे सतेज पाटलांची आमचं ठरलंय टॅगलाईन वापरून राऊत आणि आव्हाड नेमका काय संदेश देऊ इच्छित आहेत, याची चर्चा सुरु झाली आहे.