Friday, March 21, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखमोदी लोकप्रियतेच्या शिखरावर...

मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर…

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला केंद्रात येऊन आठ वर्षे झाली. या काळात देशाची प्रतिमा जगात उंचावली गेली तसेच देशातील सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून सरकारने जनहिताच्या योजना राबवल्या. कृषी कायद्यापासून ते नोटाबंदीपर्यंत मोदी सरकारने असंख्य धडाकेबाज निर्णय घेतले. देशाच्या इतिहासात केंद्र सरकारचे निर्णय थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. सन २०१४ मध्ये केंद्रात भाजपला सप्ष्ट बहुमत मिळाले. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले. संसदेत प्रवेश करताना संसद भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊनच त्यांनी पुढचे पाऊल टाकले आणि देशाचा प्रमुख म्हणून आपली कटिबद्धता या देशातील एकशेतीस कोटी जनतेशी राहील, असा त्याच क्षणाला त्यांनी विश्वास दिला. केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपच्या पहिल्याच संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, आपले सरकार कायम गरिबांचा विचार करील, गरिबांचे ऐकले आणि गरिबांसाठी काम करील. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारच्या कामकाजाचा मंत्र सबका साथ, सबका विकास हा राहिला आहे.

देशातील गरीब जनतेलाठी मोफत रेशन, घरगुती गॅस व स्वच्छ पाणी या त्रिसूत्रीवर मोदी सरकारने भर दिला. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अडीच पट किंवा इंग्लंडच्या लोकसंख्येच्या बारा पट किंवा युरोपियन महासंघातील देशांच्या लोकसंख्येच्या दुप्पटीने असलेल्या भारतीय जनतेला आज मोफत रेशन दिले जात आहे. यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या तुलनेने दुप्पटीपेक्षा जास्त रक्कम अशा योजनांवर खर्च केली आहे. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण हे गेल्या कित्येक दशकांच्या कमगिरीपेक्षा अधिक प्रभावी ठरले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणामुळेच पाकिस्तान एकाकी पडत चालला आहे. ज्या पाकिस्तानने सतत भारताला विरोध केला तोच देश भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा करीत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी भारताच्या धोरणाची प्रशंसा केल्यामुळे त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. पण नंतर सत्तेवरून पायउतारही व्हावे लागले. भारताने आपले पराराष्ट्र धोरण स्वतंत्र राखले. कोविडचे जागतिक संकट असो किंवा रशिया-युक्रेन युद्ध, भारत कोणाच्याही आहारी गेला नाही. ज्या अमेरिकेने मोदींना काही वर्षांपूर्वी व्हीसा नाकारला होता, तीच अमेरिका मोदींसाठी लाल गालिचा अंथरताना दिसते आहे. २०१४ पूर्वी भारताचा कोणीही बडा नेता किंवा पंतप्रधान विदेश दौऱ्यावर गेल्याचे कुणाला कळतही नव्हते. पण मोदींनी आपल्या कामाची पद्धत बदलली आहे. मोदींच्या दौऱ्याची दखल भारतीय व आंतरराष्ट्रीय माध्यमेही ठळकपणे घेत असतात. मोदी विदेश दौऱ्यावर असताना तेथील राष्ट्रप्रमुखांशी आत्मविश्वासाने संवाद करतातच. पण तेथील अनिवासी भारतीयांना आवर्जून भेटतात. विदेशात अनिवासी भारतीयांकडून मोदींचे जे जंगी व उत्साहाने स्वागत होते, ते पाहून भारतीय नागरिकांना निश्चितच अभिमान वाटतो. परराष्ट्र धोरण ठरवताना भारत कुणापुढेही झुकणार नाही हे मोदी सरकारने जगाला दाखवून दिले. रशियाकडून भारताने एस ४०० मिसाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहून मिसाईल खरेदीचा निर्णय तडीस नेला. अमेरिकेसारख्या महासत्तेला रशिया- युक्रेन युद्धात शांतता निर्माण व्हावी यासाठी भारताने मध्यस्थी करावी असे वाटते, हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा सर्वात मोठा म्हटला पाहिजे.

गेल्या सत्तर वर्षांत कोणत्याही सरकारला जमले नाही ते मोदींनी करून दाखवले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केल्याची सरकारने घोषणा केली आणि त्याचबरोबर कलम ३५ अ सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून ३७० वे कलम रद्द करावे हा भाजपचा प्रमुख अजेंडा होता. एक देश, एक निशान, एक संविधान ही जनसंघापासून घोषणा होती, ती मोदींनी अमलात आणून दाखवली. दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेऊन काळा बाजारवाल्यांना व दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर देशात डिजिटल व्यवहार वेगाने वाढले. जीएसटी हा सर्वात मोठा आणखी एक निर्णय म्हणावा लागेल. सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने तीन वर्षांनंतर जीएसटी संसदेत संमत केला. १ जुलै २०१७ पासून तो देशभर लागू झाला. मार्च २०२२ मध्ये जीएसटीमधून केंद्राकडे १ लाख ४२ हजार कोटी जमा झाले. जुलै २०२१ पासून दरमहा एक लाख कोटीपेक्षा जास्त जीएसटी जमा होत आहे. तिहेरी तलाक रद्द करून मुस्लीम महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय मोदींनी घेतला. १ ऑगस्ट २०१९ पासून तिहेरी तलाक गुन्हा ठरला. देशाच्या नागरिकता कायद्यात सुधारणा करून सीएए व एनसीआर लागू करण्याचे श्रेय याच सरकारला आहे. देश हितापुढे कोणाचाही विरोध न जुमानता हे कायदे केले गेले. भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मोदी सरकारने सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राइक करून जगाला आपली ताकद दाखवून दिली. जगातील सर्वात मोठी आरोग्य योजनाही मोदी सरकारने राबवली. मोदींची लोकप्रियता कायम आहे. २०२४ मध्ये विजयाची हॅटट्रीक ते संपादन करतील, असा विश्वास वाटतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -