अहमदाबाद : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी २३ मे रोजी सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर केले, त्यानंतर आरोपींना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे असून, या चारही आरोपींना गुजरात एटीएसने अटक केली होती, त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते.
या आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी या सर्व आरोपींना सा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या चौघांना बनावट पासपोर्टच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आरोपींकडे सविस्तर चौकशी केली असता, ते १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील वॉन्टेड आरोपी असल्याचे समोर आले त्यांनतर या सर्वांना अटक करण्यात आली, असे गुजरात एटीएसच्या डीआयजींनी सांगितले. मुंबईतील या साखळी बॉम्बस्फोटात विविध ठिकाणी २५७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जण जखमी झाले होते.