राजापूर (प्रतिनिधी) : हजारो कोटींची गुंतवणूक असलेला आणि लाखो बेरोजगारांच्या हाताला काम देताना कोकणातच नाही तर राज्यात आर्थिक क्रांती घडविणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होणार आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे तुम्ही आमच्यावर सोडा असे सांगतानाच या प्रकल्पाच्या आड येणाऱ्यांविरोधात वेळ पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करा, मी तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला.
शिवसेनेत मुख्यमंत्र्यांसह ९९ टक्के लोकांनी या प्रकल्पाचे समर्थन केलेले असतानाही शिवसेनेचे दळभद्री खासदार विनायक राऊत मात्र आजही या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्याला रिफायनरीतले काय कळते तरी का? असा खडा सवाल उपस्थित करून कोकणी जनतेची आर्थिक उन्नती रोखू पाहणाऱ्या, इथल्या बेरोजगार तरूणाईच्या तोंडचा घास हिरावू पाहणाऱ्या खा. राऊत याला आता थेट गावबंदीच करा असे आवाहनही निलेश राणे यांनी यावेळी केले.
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या स्वागतासाठी भाजपच्या वतीने रविवारी राजापुरात रिफायनरी स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी निलेश राणे बोलत होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात कोकण, राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाला कशाप्रकारे गती मिळणार आहे याबाबत राणे यांनी माहिती दिली. हजारो कोटींची गुंतवणूक असलेला आणि लाखो बेरोजगारांच्या हाताला काम देऊन आर्थिक क्रांती घडविणारा हा प्रकल्प राजापुरात झालाच पाहिजे नव्हे तो होणारच, असा विश्वास यावेळी राणे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेतील ९९ टक्के लोकांनी या प्रकल्पाचे समर्थन केलेले आहे. मात्र शिवसेनेचा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत हाच या प्रकल्पाला विरोध करत आहे. या खासदाराला रिफायनरीतले काय कळते असा खडा सवाल उपस्थित करून शिवसेनेने कोकणच्या आणि मराठी माणसाच्या नावावर केवळ राजकारण केले असा घणाघात राणे यांनी केला. गेली आठ वर्षे शिवसेना सत्तेत आहे, या सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेने कोकणाला काय दिले, किती प्रकल्प आणले, किती बेरोजगारांना रोजगार दिले असा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला. कोणताही प्रकल्प येवो, विरोध करायचा, चिरीमीरी घ्यायची आणि जनतेची दिशाभूल करायची हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका राणे यांनी यावेळी केली.