Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीजीवनातील दु:ख विसरुन आकाशी झेप घ्या - नितीन गडकरी

जीवनातील दु:ख विसरुन आकाशी झेप घ्या – नितीन गडकरी

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना १५ लाखांच्या पॅकेजचे वितरण

नागपूर : तुमच्या आयुष्यात झालेली दुर्घटना जीवनात अंध:कार निर्माण करणारी आहे. मात्र यातून सकारात्मकवृत्तीने बाहेर पडणे आवश्यक आहे. शासन तुमच्या कायम पाठिशी आहे. निराश न होता पुढील मार्गक्रमण करा, आकाशी झेप घ्या, असे भावनिक आवाहन केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

कोरोना साथरोगात ज्यांचे आई-वडील मृत्युमुखी पडले अशा अनाथ बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत ऑनलाईन संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात महिला व बाल कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानंतर जिल्ह्यातील अनाथ बालकांशी. गडकरी यांनी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७९ आहे. त्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखाचे पॅकेज मंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी आर. विमला, महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त रवी पाटील उपस्थित होते.

यावेळी गडकरींनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय जिव्हाळ्यातून ही योजना आणली आहे. मुलांना त्यांच्यासोबत घडलेल्या अघटीतातून बाहेर काढण्यासाठी, निराशेतून प्रकाशाकडे नेण्यासाठी, संकटावर मात करुन यशस्वी होण्यासाठी, अतिशय बारकाईने ही योजना आखण्यात आली असून कोणत्याच निराधाराला शासन दुर्लक्षित करणार नाही. त्यामुळे मुलांनी सकारात्मक वृत्तीने आपल्या आयुष्याचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सेवा हेच कर्म माणणाऱ्या शासनाची ही भावनिक पूर्तता असल्याचे सांगितले.

कोरोना साथरोगामुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड’ निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. या मुलांना वयाच्या २३ वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना पाच लक्ष रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियम देखील पीएम केअर्स फंडातून भरला जाणार आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १० हजारावर आहे. मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये जिल्ह्यातील २७०० मुलांचे आई किंवा वडील गेलेल्याचा समावेश आहे. ७९ मुलांचे आई आणि वडील दोघेही या महामारीत मृत्युमुखी पडले आहे. काहींच्या नातेवाईकांनी त्यांना स्वीकारले नाही. अशा मुलांची काळजी शासन घेत आहे. केंद्र शासनासोबत राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या मुलांना आयुष्यात प्रतिष्ठा आणि संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची, निवाऱ्याची व्यवस्था शासन करणार आहे. या संदर्भातील सर्व दस्तऐवज व स्नेह प्रमाणपत्र आज मुलांना वितरीत केले गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -