Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे‘हॅपी स्ट्रीट’ला डोंबिवलीकरांची उत्स्फूर्त दाद

‘हॅपी स्ट्रीट’ला डोंबिवलीकरांची उत्स्फूर्त दाद

ज्येष्ठांसह तरुणाईने सादर केला नृत्य-गायकीचा कलाविष्कार

प्रशांत जोशी

डोंबिवली : डोंबिवलीकर नागरिकांना त्यांच्या घरातून बाहेर पडून रस्त्यावर नृत्य, खेळ, योगा आणि संगीताच्या साथीने गायन अशा निरोगीपणाच्या क्रियेत रविवारी व्यस्त ठेवण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. रस्त्यावर रहदारीच्या गोंधळ व प्रदूषणाशिवाय या अनोख्या ‘हॅपी स्ट्रीट’ फडके रोड उपक्रमाला डोंबिवलीकरांची उत्स्फूर्त दाद दिली. ज्येष्ठांसह तरुणाईने नृत्य, गायन, मौजमस्ती करीत आपला कलाविष्कार सादर करण्याचा आनंद घेतला. डोंबिवलीत होणाऱ्या अशा उपक्रमाचे अनुकरण इतर राज्यात-परदेशात केले जाते, अशी चर्चाही डोंबिवलीत सुरू होती.

पूर्वेकडील फडके रोडवर रविवारी सकाळी ६ ते ९.३० या वेळेत सर्वच वाहनांना वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला होता. कारण म्हणजे तरुण आणि वृद्धांना कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्यासाठी रांगेत लावलेल्या विविध उपक्रमांचा आनंद त्यांना घेता यावा. यामध्ये संगीत ते स्केटिंग, स्केटिंग ते ध्यान आणि योगा आदी उपक्रम सर्व वयोगटांसाठी आनंद घेण्यासाठी होते. या उपक्रमाला डोंबिवलीकर नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना महासंकटाशी सामना करावा लागला होता. कित्येक कुटुंबांवर हलाखीची परिस्थिती, तर अनेक कुटुंबातील माणसे कोरोनामुळे मृत्युमुखी पडली. या अप्रत्यक्षरूपी राक्षसी संकटामुळे त्यांना व्यक्तिगत दुःखातून सावरण्यासाठी आगळी-वेगळी संकल्पना हा उद्देश म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या माध्यमातून कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे तसेच सर्वच पोलिसांच्या सहकार्याने ‘हॅप्पी स्ट्रीट’ संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. या उपक्रमात डोंबिवलीकरांना धम्माल-मस्ती, खेळ, जॉगिंग, डांस, संगीतातून गाणे, लहान मुलांसाठी क्रिकेट, फटबॉल, बॉलिवूड डान्स, एसडी डान्स, लाइव्ह झुम्बा सेशन्स तसेच तायक्वांदो, स्व-संरक्षण, किकबॉक्सिंग आणि कराटे, तर क्ले मॉडेलिंग, क्ले पेंट आणि क्ले पॉटरी अशा विविध कार्यक्रमांतून डोंबिवलीकरांसह पोलीस कर्मचाऱ्यांनाही याचा आनंद घेता आला.

लोकांना रोजच्या व्यापातून थोडा विरंगुळा मिळाला. सर्वजण एकत्र येऊन आनंद घ्यावा या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. असा उपक्रम वर्षातून तीन-चार वेळा घेतला तर फारच छान होईल. आमच्या नेहमीच्या कार्यक्रमतील हा एक भाग होता. पण डोंबिबलीकरांनी छान प्रतिसाद दिल्यामुळे आता सर्वदूर त्याचे अनुकरण निश्चित होईल, असा विश्वास वाटतो. – जे. डी. मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -