Thursday, June 19, 2025

भाजपचे आजपासून १४ जूनपर्यंत देशव्यापी जनसंपर्क अभियान

भाजपचे आजपासून १४ जूनपर्यंत देशव्यापी जनसंपर्क अभियान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपचे केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्य सरकारांच्या सर्व मंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी देशव्यापी जनसंपर्क अभियान हाती घेणार आहेत. त्याअंतर्गत सरकारने गरिबांच्या कल्याणार्थ राबविलेल्या विविध योजना आणि सुप्रशासनाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविण्यात येणार आहे, असे भाजपतर्फे सांगण्यात आले.


भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी मोदींचे वर्णन ‘विश्वासार्ह, लोकप्रिय, निर्णायक, त्याग करणारा आणि तपस्वी नेता’, असे करून अवघे राष्ट्र त्यांच्यामागे उभे असल्याचे सांगितले. सिंग यांनी सांगितले, की, मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप ३० मेपासून पंधरवडा साजरा करणार आहे. ३० मे ते १४ जूनपर्यंत मोदी सरकारचे प्राधान्य असलेल्या सुप्रशासन आणि गरीब कल्याण योजनांवर भर देत व्यापक जनसंपर्क अभियान आयोजित केले आहे. त्याचा एक भाग म्हणून ७५ तासांची स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क मोहीम राबवण्यात येईल.


त्यात सर्व केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांतील मंत्री आणि पक्षाचे गावोगावांतील सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पंधरवड्यातील प्रत्येक दिवशी शेतकरी, महिला, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतील. कोरोनाच्या साथीत पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी ३० मे रोजी मोदी मदतनिधीचा धनादेश देतील.शिष्यवृत्ती योजनाही ते यावेळी जाहीर करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Comments
Add Comment