सीमा दाते
सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेच. मात्र पहिल्यादा ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेच्या आरक्षणाबाबत राज्य निवडणूक आयोगासाठी हे आव्हान असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकांची तारीख जाहीर करून निवडणूक पार पाडण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाने नवीन प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर करून अधिसूचना देखील प्रसिद्ध केली होती. यावेळी होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही २३६ प्रभागासाठी होणार आहे. ९ प्रभाग वाढवण्याचे राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर आता याबाबत मंजुरी देऊन अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर ३१ मे रोजी प्रभागांची आरक्षणबाबत सोडत निघणार आहे, ही सोडत सगळ्याच राजकीय पक्षांसाठी आणि विशेष म्हणजे इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची असणार आहे. पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणाशिवाय ही सोडत काढण्यात येत आहे, तर लॉटरी प्रक्रियेवर सूचना आणि हरकती मांडण्यासाठी ६ जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे, तर १३ जून रोजी आरक्षणावर शिकामोर्तब केले जाणार आहे. दरम्यान कोणालाही सूचना आणि हरकती असल्यास मुंबई महानगरपालिका मुख्यालय तसेच मुंबईतील २४ प्रभागांमध्ये नोंदवण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या सोडतीमध्ये महिलांसाठी ११८ प्रभाग राखीव, तर ओबीसी आरक्षणाचे ६१ प्रभाग हे खुले प्रभाग होणार आहेत. या आरक्षण सोडतीवर १ ते ६ जूनपर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील व १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोडतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मतदार यादी तयार करण्यात येणार आहे, तर यादीवरही मतदारांच्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार असून मतदार यादीत नाव नसल्यास, पत्ता बदली झाल्यास, वयाबाबत चुका अशा प्रकारच्या तक्रारींचे निरसन करण्याच्या प्रक्रिया पार पडणार आहेत, तर या सर्व प्रक्रियांसाठी साधारण दीड महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे निवडणूक पूर्वतयारीसाठी अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधी लागू शकतो. म्हणजे सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन ४५ दिवसांची आचारसंहिता लागू झाल्यास ऑक्टोबरमध्ये निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे
मात्र आता राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत सगळ्याच पक्षांची घोडदौड सुरू झाली आहे. एकीकडे भाजप- मनसे एकत्र तयारीला, तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा सुरू झाली आहे, तर राजकीय पक्ष आपली ताकद बघण्यासाठी अंतर्गत बैठका घेत आहेत, नुकतीच पक्षबांधनीसाठी मनसेनेही बैठक घेतली होती, तर भाजप देखील पोलखोल अभियानअंतर्गत आपले शक्तिप्रदर्शन दाखवत आहे. दुसरीकडे शिवसेना ही आता शिवसंपर्क अभियान घेत असून आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे निवडणुकांची तारीख जाहीर होण्याआधी सगळ्या राजकीय पक्षांना आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवावे लागणार आहे. यावेळी तसं काही प्रमाणात निवडणूक सगळ्याच पक्षासाठी अटीतटीची असणार आहे. एकीकडे वाढलेले प्रभाग, यावेळी २२७ नाही, तर मुंबईतील ९ प्रभाग वाढून २३६ प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे जुन्या प्रभागात मेहनत केलेल्या आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराला कदाचित तिकिटासाठी मुकावे देखील लागणार आहे, तर राजकीय पक्षांना आपली ताकद कोणत्या प्रभागात जास्त आहे हे पाहून बलवान उमेदवार द्यावा लागणार आहे. निवडणुकीत शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टी हे ७ पक्ष जरी असले तरी मुख्य निवडणूक सेना-भाजपमध्ये होणार आहे, तर यावेळी आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीनिशी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उतरणार आहे. पश्चिम उपनगरात तर आम आदमी पार्टीची तयारी देखील झाली आहे. उपनगरातील झोपडपट्टी परिसरात आम आदमी पक्ष टार्गेट ठेवून आहे. त्यामुळे वसाहती, झोपडपट्टी, चाळी यांमध्ये आम आदमी पक्षाचे नेते, कार्यकर्ते स्वत: उतरत आहेत. यामुळे यंदा मुंबई महापालिका मिळावी म्हणून सगळेच तयारीला लागले आहेत.
तर ३१ तारखेला प्रभागांची सोडत निघाल्यावर कुठे कोणते आरक्षण आणि खुल्या जागा आहेत, हे स्पष्ट होणारच आहे. त्यानंतर मात्र उमेदवारीसाठी सगळ्यांची पळापळ आणि राजकीय बदल पाहायला मिळतील हे नक्की.