ठाणे (प्रतिनिधी) : सिक्कीम येथे फिरण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील पर्यटकांची गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात टेंभी नाका येथील एकाच कुटुंबातील चार जणांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने टेंभी नाका येथील जैन समाजावर शोककळा पसरली आहे.
सुरेश पुनमिया (४०), तोरण पुनमिया (३८), हिरल पुनमिया (१४), देवांश पुनमिया (१०) आणि जयन परमार (१३) अशी नावे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ठाण्यातील पर्यटकांची आहेत. ठाण्यातील पाच कुटुंबातील १८ जण २६ मे रोजी सकाळी विमानाने सिक्कीम येथे फिरायला गेले होते. त्यामध्ये टेंभी नाका येथील ओशो महावीर गृहनिर्माण सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुरेश पुनमिया यांच्या परिवाराचा समावेश होता तसेच खोपट येथील सीएनजी पंप परिसरात राहणारे अमित परमार हे त्यांची पत्नी आणि मुलगा जयन यांच्यासह इतर तीन कुटुंबेही त्यात होते.
२८ मे रोजी सकाळी हे सर्व जण तीन गाड्या घेऊन पर्यटन स्थळे पाहण्यासाठी गेले होते. दोन गाड्या हॉटेलवर पोहोचल्या होत्या, परंतु एक गाडी रात्री उशिरापर्यंत हॉटेलवर परत आली नाही, त्यामुळे इतर सर्वांना काळजी वाटू लागली होती. मागील गाडीत अमित परमार यांचा मुलगा जयन होता, त्यामुळे त्याच्या आईला देखिल काळजी वाटत होती. या सर्वांनी तेथील स्थानिक पोलिसांना गाडीबद्दल माहिती दिली. सकाळी येथील पोलिसांनी या पर्यटकांना माहिती दिली की उत्तर सिक्कीम भागातील खोडांग येथील २५० मीटर खोल दरीत त्यांची कार कोसळून त्यामध्ये वाहन चालकासह पाच पर्यटकांचा मृत्यू झाला.
स्थानिक पोलीस आणि सैन्य दलातील जवान यांनी दरीत कोसळलेली कार बाहेर काढली. त्यांचे मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच ठाण्यातील त्यांच्या नातेवाईकांनी सिक्कीमला धाव घेतली असून या सर्वांचे मृतदेह उद्या दुपारी ठाण्यात आणण्यात येणार असल्याचे टेंभी नाका येथील गुणवंत यांनी सांगितले.