ठाणे (प्रतिनिधी) : रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रात १८० किलोमीटर लांबीची विशेष रेल्वे मालवाहतूक मार्गिका (डीएफसी) प्रकल्प राबवण्यात येत असताना या मार्गात येणाऱ्या ६०२ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, तर रेल्वे मार्गिकेच्या आड येत असलेल्या ८८९ झोपडीधारकांपैकी ७९४ झोपडपट्टीवासीयांना पात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १२ गावांचा समावेश केला आहे, तर उर्वरित झोपडीधारकांना अपात्र ठरवण्यात आले. तसेच उर्वरित पात्र झोपडीधारकांकडून जागा सोडण्यासाठीचे हमीपत्र घेण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या कामांना प्रारंभ केला मात्र कोरोनाच्या काळात प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन हस्तांतरणाचे काम रखडले होते. मात्र आता कोरोनाकाळातील परिस्थिती राहिलेली नसल्यामुळे आणि पुनर्वसनाचा मोबदला मिळालेल्या रहिवाशांची घरे जमीनदोस्त करण्याच्या कामांना गती आली आहे.
ठाणे जिल्ह्यातून ४० किलोमीटर लांबीची मार्गिका जाणार असून, कल्याण आणि भिवंडी तालुक्यांतील ८८९ झोपड्यांचेही सर्वेक्षण करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका, भोपर, कोपर, ठाकुर्ली, आयरे, जुनी डोंबिवली, गावदेवी, भिवंडी तालुक्यातील खारबाव, वढूनघर, पिंपळास आणि ठाकुर्ली आदी गावांचे नामोनिशाण कायमचे पुसले जाणार आहे.
‘डीएफसी ’प्रकल्पातंर्गत कल्याण आणि भिवंडी तालुक्यांमधील १२ गावे असून, याच गावांमधून ४० किलोमीटर लांब मार्ग जाणार आहे. या प्रकल्पाच्या आड येत असलेली ६०२ बांधकामे संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तोडली असून, आणखी काही बांधकामे पाडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या महत्त्वांकाक्षी प्रकल्पासाठी ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतील १०२ गावांमधील खासगी २५० हेक्टर जागा व १७८ हेक्टर शासकीय जागांचेही संपादन करण्यात येणार आहे.
मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्ट्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार असल्याने महाराष्ट्रातून पश्चिम डेडिकेटेड कॉरिडॉर (डीएफसी) जाणार आहे. हा मार्ग जवाहरलाल नेहरू बंदर येथून सुरू होईल आणि तो ठाण्याहून पुढे दिल्लीपर्यंत जाईल. मध्य रेल्वेने अलीकडेच ठाणे ते मुंब्रापर्यंत लोकल वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गिका स्वतंत्र केल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून लांब पल्ल्याच्या गाड्या आणि जलद लोकल्स पारसिक बोगद्यातून जात असत; परंतु आता पारसिक बोगद्यातून मालवाहू गाड्यांची वाहतूक सुरू असल्याने, येत्या भविष्यात ‘डीएफसी’तर्फे जाणारी व येणारी मालवाहतूक याच पारसिकमधून होण्याची दाट शक्यता आहे.






