Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रनांदगावात सतारी शिवार परिसरात दहा मोरांचा मृत्यू

नांदगावात सतारी शिवार परिसरात दहा मोरांचा मृत्यू

नांदगांव (प्रतिनिधी) : नांदगांव तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात शनिवारी दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे.

आमोदे येथील विठ्ठल लाला पगार यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०० या क्षेत्राला लागून असलेल्या खाजगी व ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या परिसरात काही मोर मृत्युमुखी पडले असल्याचे शेतकरी दीपक पगार हे कामासाठी शेतात जात असताना त्यांच्या निर्दशनास आले. त्यांनी ही माहिती आमोदे गावातील पत्रकार महेंद्र पगार यांना दिल्यानंतर पगार यांनी तत्काळ या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून कळविली. नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी जवळपास दहा मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले.

वन विभागाचे आरएफओ चंद्रकांत कासार, वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ, एन. के. राठोड, आर. के. दौंड, वनपाल सुनील महाले, वनमजुर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला. सदर मोरांचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. याबाबत पुढील तपास नांदगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये चार लांडोरांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या मोरांचे नांदगांव येथील पशू वैद्यकीय रुग्णलायत शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -