रवींद्र तांबे
विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार वाचनातून होत असून वाचनामुळे विद्यार्थ्यांचे मन आनंदाच्या अनुभूतीने भरून जाते. तेव्हा अभ्यास करताना विद्यार्थ्यांचे मन प्रफुल्लित होऊन कोणत्याही प्रकारचे विद्यार्थ्यावर दडपण येत नाही. तेव्हा नियमित वाचन ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे.
विद्यार्थ्यांनी आता अभ्यासक्रमातील वाचनाबरोबर अवांतर पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. पुस्तक वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. वाचन ही कला असून वाचन माणसाला माणूस बनविते. आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळते. कोणत्याही घटनेविषयी विचार करायला लावते. आपल्यात जाणीव जागृती होते. त्यामुळे एखाद्या समस्येवर विचार काढून मार्ग काढू शकतो. सध्या मोबाइलमुळे वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी मोबाइलचा आवश्यक कामासाठी वापर करून मोबाइल चार हात दूर ठेवून पुस्तक वाचनाकडे वळले पाहिजे.
मागील दोन वर्षे कोरोना व्हायरसच्या विषाणूशी सामना करताना घराच्या चार भिंतीच्या आत राहून विद्यार्थ्यांना सामना करावा लागला. या गोष्टीची सर्व विद्यार्थ्यांना चांगली माहिती आहे. आज जरी कोरोना व्हायरसच्या काळातील शासकीय नियम शिथिल करण्यात आले तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे यात विद्यार्थ्यांचे जास्त नुकसान झाले. एक वेळ फळ्यावरील शिकवले जाणारे शिक्षण मोबाइलच्या स्क्रीनवरून शिकवले जाऊ लागले. यात अनेक विद्यार्थ्यांच्या घरी मोबाइल नसल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. अशी परिस्थिती मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची झालेली पाहायला मिळाली. म्हणजे राज्याच्या राजधानीत अशी परिस्थिती, तर खेडोपाडी काय झाले असेल, याचे चित्र सहज लक्षात येते. यात समाधानाची बाब म्हणजे, कुडाळ तालुक्यातील दारीस्ते गावातील स्वप्नाली सुतारच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीची दाखल प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली.
काही ठिकाणी एक मोबाइल आणि चार ते पाच विद्यार्थी वापरू लागले. यात जरी दोन वर्षे गेली तरी डोळे फाडून ५ ते ६ इंच साईजच्या मोबाइल स्क्रीनवर बघण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. त्यात कधी कधी रेंजची समस्या, इंटरनेट नाही, त्यात आर्थिक चणचण, तर काहींच्या घरचा कर्ता पुरुष गमावला अशा अनेक कारणांनी विद्यार्थी वर्ग जेरीस आला. काहींना, तर आजही काय करावे ते सुचत नाही.
आता तर २ एप्रिलपासून सामायिक अंतर कायम ठेवले तरी इतर शासकीय नियम शिथिल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा सुरू होऊन उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. ऑनलाइन शिक्षण ऑफलाइन झाले. काही परीक्षा ऑफलाइन चालू आहेत. आता कडक उन्हाळा अंगाला झोंबू लागला. त्यात अधूनमधून पावसाची वारी असली तरी पाणीटंचाईची लोकांना झळ बसत आहे. तेव्हा सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांनी आता वाचनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.
अनेकांना मोबाइलवरील शिक्षणामुळे डोळे दुखणे, डोके जड होणे, मोबाइलकडे एकटक पाहिल्यामुळे मान दुखणे अशा अनेक आजारांचा सामना करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. यातून आता विद्यार्थीवर्ग सावरत आहे. त्यांना पालक वर्गाने साथ द्यायला हवी.
काही विद्यार्थी त्याचा गैरवापर करतात. त्यांनी पण आई-वडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. आपण पण आई-वडिलांच्या शेवटपर्यंत आज्ञेत राहिल्यामुळे आत्ता समाधानकारक जीवन जगत आहे. त्यासाठी आई-वडिलांच्या आज्ञेत राहून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. यश आपल्या जवळ असते, तेव्हा नेहमीच प्रयत्न करायला हवा. एक दिवस विजय आपलाच असतो. तेव्हा प्रत्येक दिवशी पुस्तकाची पाच पाने जरी वाचली तरी एक पुस्तक एका महिन्यांमध्ये वाचून आपण पूर्ण करू शकतो. असे वाचत राहिलो, तरच आपण वाचू शकतो. मोर्चात सहभागी होऊन, स्पीकर लावून, नाचो करून, सुपारी घेऊन, नकला करून, दलालगिरी व दादागिरी करून, आपले उदरनिर्वाह होणार नाही, तर उलट एकमेकांविषयी चीड निर्माण होऊन याचे रूपांतर वादात होईल. वाद झाल्यास त्याचे रूपांतर दंगलीत होईल. याचा परिणाम अनेकांना मनस्ताप सहन करावा लागेल.
वाचनाने वाणीवर सुसंस्कार होतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी आजपासून वचनबद्ध झाले पाहिजे की, मी कोरोना काळ जवळून पाहिला आहे. घरातील अथवा जवळच्या नातेवाइकाचा मृत्यू होऊन सुद्धा त्याचे शेवटचे दर्शन कुटुंबातील तसेच नातेवाइकांना झाले नाही. इतकी गंभीर परिस्थिती पाहिली आहे. आता दोन वर्षांच्या तपानंतर नाका-तोंडावरील मास्क काढून मोकळा श्वास घेत आहोत. तेव्हा कोरोना व्हायरसच्या नियमांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाकडे वळावे लागेल.