पालघर (वार्ताहर) : भुसावळ-बोईसर ही बस पालघरच्या वाघोबा घाटात शुक्रवारी सकाळी सहा वाजता दरीत उलटली. अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले. जखमींना पालघरच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. रातराणी बस सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला.
या चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून भरधाव गाडी चालवणाच्या नादात वाघोबा घाटात बस दरीमध्ये उलटली. बस उलटून तीन पलटी मारत घाटातील नदी पात्रा जवळच अडकली. प्रवासी झोपेत असल्याने काहीना गंभीर दुखापत झाली.
वाहकाने चालकास गाडी वेगाने चालवू नको असे सांगितले होते. तरीही चालकाने त्याचे ऐकले नाही. वाहक दीपक शिंदे हे भुसावळ येथून बसवर कर्तव्यावर होते, तर चालक धनगर हे नाशिक येथून कर्तव्यावर रुजू झाले होते. चालक धनगर हे नाशिक येथूनच मद्यपान करून बस चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
महामंडळाने चालक, वाहक कर्मचाऱ्यांची दर आठवड्यात वैद्यकीय तपासणी करावी. जेणेकरून मद्यपान करून चालक असे प्रवाशांच्या जीवाशी खेळणार नाही. -उमेश पाटील, पोलीस निरीक्षक पालघर
आम्ही चालकाचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर अहवाल आल्यावर चालकावर कारवाई करण्यात येईल. -आशिष चौधरी, उपनियंत्रक, पालघर विभाग, म. रा. महामंडळ