Thursday, July 25, 2024

सोशिकता…!

प्रियानी पाटील

ती म्हणजे जिवंत प्रेरणा आहे, जिवंत विचार आहे. ती सोशिक आहे म्हणून तिने सारं आयुष्य सहनच करत राहावं, हा विचार घर-कुटुंबातून झटकून टाकला पाहिजे.

आजवर अनेक चित्र, कल्पना, कविता, संदर्भातून स्त्रीच्या सोशिकतेची कहाणी मांडली गेली असेल. पण तिच्या मनाची समज आणि सल काढण्याचा प्रयत्न कुठच्या कल्पनेतून खरंच झाला असेल का? कविता लिहिली, सोशिकता मांडली की वास्तववादी चित्र स्पष्ट होतं, पण त्यावर भूमिका मांडल्या जातात का? त्यातून स्त्रीयांच्या समस्यांचे निराकरण केले जाते का? याचा पाठपुरावा कवीने अंतरंगापासून केला, तर त्या कवीची कविता, शब्द आणि विषयाची खोलवर मांडणी या साऱ्यालाच पुरेपूर न्याय मिळू शकेल.

अनेक चित्रांतूनही स्त्रीच्या मनीचं दारुण दु:ख दाखवलं जातं. चित्र पाहून हृदय हेलावतं. पण समाजात अनेक स्त्रिया दु:खी-कष्टी असतात, त्यांच्या दु:खावर फुंकर मारण्याचं धाडस कुणी करेल तर त्या दु:खाला खऱ्या अर्थाने न्यायही मिळू शकेल. स्त्रीची सोशिकता समजायला काही दिव्य करावे लागत नाही. आईचे कष्ट समजायला मुलाकडे वेळ असला पाहिजे, पत्नीचं मन समजायला नवरा मनाने तिचा असला पाहिजे, बहिणीचे प्रेम समजायला भावाला वेळ असला पाहिजे, नात्यानात्याची सांगड घालताना आई, मुलगी, बहिणी-बहिणी, नणंद-भावजय, जावा-जावा यांच्यातही एकोपा असणं गरजेचं आहे.

खरं तर पती-पत्नीचं नातं हे जेव्हा पती पत्नीला फसवून सोज्वळतेचा आव आणत असतो तिथेच खरं तर फसलेलं असतं. काळ्या मण्यांच्या धाग्यातलं तिच्या संसाराचं अस्तित्व शोधताना ती कोणत्या तरी भ्रमात वावरून वटपौर्णिमेसाठी डोळे लावून बसलेली असते. पण तिच्या सोशिकतेचा अंत पाहण्याचा अधिकार या नवऱ्यांना मुळात दिला कुणी? जिथे तिची साेशिकता सुरू होते, तिथे सहनशीलताही तिच्या अंगी भिनलेली असते, हे देखील तितकेच वास्तव आहे.

सोशिकता जाणताना तिच्या डोळ्यांत अश्रूच आले की, तिची सोशिकता भळाभळा वाहते असा त्याचा अर्थ नसतो. सहनशील वृत्तीने तिचं वावरणं आणि चुकीच्या माणसालाही समजून घेण्याची तिची वृत्ती सोशिकतेचा कस ठरते.

तिच्या जन्मोजन्मीच्या कहाण्या मांडताना आजवर स्त्रीची रूपं ही सोशिकतेचा तळ गाठणारी ठरली अाहेत. अनेकदा या सोशिक वृत्तीतूनही अनेक समस्यांचे निराकरणही करते. ती अनेकांच्या प्रश्नांवर उत्तर म्हणून ठरते. अनेक समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती तिच्यात असते, पण हे सारं ती करत असते, स्वत:च्या साऱ्या समस्यांचं घोंगडं भिजत ठेवूनच. कारण तिच्या समस्यांवर ना ती काही पर्याय शोधते, ना त्या दुसऱ्यासमोर मांडते. तिची साेशिकवृत्ती ही आई म्हणून, पत्नी, बहीण म्हणून आजही तशीच असलेली दिसून येते. कारण गृहिणी म्हणून तिच्या पावलांना मर्यादांचं बंधन तिचं तिनेच लावून घेतलेलं असतं, की कुणी सांगण्याअगोदरच तिचं पाऊल उंबरठ्यात अडखळलेलं असतं. हा मर्यादेचा उंबरठा प्रत्येकासाठी असतो खरा तर, पण आजवर ती आणि उंबरठा असं गाणित झाल्यामुळे उंबरठ्याबरेाबरच मर्यादाही तिच्याच वाट्याला आलेल्या असतात.

ऊन, पावसात तिची कामं तिला सांगण्याची गरज कुणालाच भासत नाही. कारण तिच्या सर्वसोशिक मनाला साऱ्या गोष्टी अंगवळणी पडून गेलेल्या असतात. घर कितीही श्रीमंत असलं तरी पावसात लागणाऱ्या वस्तू, पदार्थ बनवताना ती जराही मागे सरत नाही. इथे प्रत्येकीची आवड तिने जोपासलेली असते आणि हे करताना तिने आपल्या आवडी-निवडी आपसुकच बाजूला सारलेल्या असतात. तिची सोशिकवृत्ती तिच्या म्हणण्यातून दिसून येण्यापेक्षा ती तिच्या कृतीतूनही बऱ्याचदा जाणवून येते, पण त्याची दखल तिच्या कुटुंबीयांकडून जरी घेतली गेली तरी ती तिच्यासाठी फार मोलाची ठरते.

जन्माला येताना स्त्री म्हणून, मुलगी म्हणून वावरताना परक्याचे धन म्हणून आणि विवाहानंतर ती एक गृहिणी म्हणून तिची सोशिकता जाणताना तिला तिची असलेली मते, तिचे विचार जाणून घेणे गरजेचे आहेत. ती म्हणजे जिवंत प्रेरणा आहे, जिवंत विचार आहे, जिवंत जगण्याचा प्रवाह आहे, जो आपल्या सोशिक वृत्तीतून सर्वांसमोरच आदर्शवत ठरू शकतो. ती सोशिक आहे म्हणून तिने सारं आयुष्य सहनच करत राहावं हा विचार घर-कुटुंबातून जरा झटकून टाकला पाहिजे, तरच तिच्या सोशिकतेतून तिला जराशी मोकळीक मिळेल. समाधानाचा श्वास ती आयुष्यभर घेऊ शकेल.

priyanip4@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -