Saturday, April 26, 2025
Homeकोकणरायगडशहापूर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व शेतीच्या कामांची लगबग सुरू

शहापूर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व शेतीच्या कामांची लगबग सुरू

शिवाजी पाटील

शहापूर : उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने या वर्षी वेळेआधी मान्सून बरसणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे शहापूर तालुक्यातील खर्डी, कसारा, किन्हवली, डोलखांब, शेनवे, वाशिंद, अघई परिसरातील शेतकऱ्यांची शेतीची कामे उरकण्याची लगबग सुरू झाली आहे.

तालुक्यात एप्रिल-मे महिन्यात शेतातील सर्व कामाची लगबग सुरू होते, यात मागील पावसाळ्यात पूरहानीमध्ये शेताच्या बांधाची झालेली दुरवस्था त्यांची दुरुस्ती करणे, शेतातील अतिरिक्त गवत काढून टाकणे, बांधावर जास्त प्रमाणात वाढलेली झाडे-झुडपे तोडणे, शेतात शेणखत टाकणे, जास्त पावसाने शेतातील माती व पालापाचोळा वाहून जाऊ नये म्हणून शेतातील पाण्याच्या वाटा बंद करणे, तसेच जुन्या विळ्या-कोयत्यांना धार लावणे, नांगरणीच्या कामासाठी लागणारे अवजारे तयार करून ठेवणे, पावसाळा हंगामासाठी लागणारे सामान साठवून ठेवणे, शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांना आगाऊ बयाणा देणे, आर्थिक नियोजनासाठी सेवा सहकारी सोसायटीमध्ये शेती कर्जासाठी अर्ज दाखल करणे, लाकूड-फाटा जमा करणे, अशा अनेक कामांची पूर्वतयारी शेतकऱ्यांना करावी लागते, तसेच शेतीपूरक व्यवसाय म्हणून काही शेतकरी विटभट्टी व्यवसाय करतात.

त्यांची कामे देखील अंतिम टप्प्यात आली आहेत, एकंदरीत पाऊस एक आठवडा अगोदर धडकण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे.

मे महिना सरत आला की, आम्हा शेतकऱ्यांचे डोळे लागतात ते पावसाकडे आणि त्याअगोदर करायच्या शेतीच्या कामांकडे. या वर्षी बियाणांच्या व खतांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत, यामुळे शेतकऱ्यांवर अधिकचा खर्चाचा बोजा पडणार आहे. सरकारने किमान खते व बियाणांच्या किमती तरी कमी करायला हव्यात.– उमेश धानके, शेतकरी, वशाळा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -