
डॉ. पल्लवी परुळेकर - बनसोडे
‘का कशा विसावल्या
तिन्ही सांजा
तिमिराच्या कुशीत
जागतो मनीचा काजवा...
'ती' अन् तिची प्रीतच अनोखी... मनाला विकलांग करणारी... ओरेली एक गोड मुलगी, निळसर करड्या डोळ्यांची, दुधाळ सतेज कांती आणि मधाळ हसणारी... कोणालाही मोहात पाडेल अशी. ईश्वराप्रती प्रचंड आस्था असणारी, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट कन्फेस करणारी. कधी प्रेमात पडली ते कळलंच नाही आणि गुंतली अशी की, तो गुंता सोडवण्यातच जिंदगी बरबाद झाली.
‘प्रिन्स’ एक हळवा प्रियकर. उंच गव्हाळी रंगाचा, स्मार्ट, हुशार. कोणातही सहज मिसळून जाणारा, लाघवी असा. फुलपाखरासारखा अलवार ओरेलीला जपणारा. दृष्ट लागावी तसा हा जोडा. दोघेही आपल्या भविष्यासाठी झटणारे. कॉलेज लाइफमध्ये असूनही मर्यादेच्या सीमा न ओलांडणारे. या दोघांना कोणाची नजर लागली कोण जाणे पण प्रिन्स ज्या ग्रुपमध्ये होता, त्या ग्रुपचे कॉलेज कॅम्पसमध्ये एका दुसऱ्या ग्रुपबरोबर हाणामारीचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, हमरीतुमरीवरून एकमेकांच्या जीवावर बेतले. कोणी ऐकायला, समजावून घ्यायला तयार नव्हते. बघ्यांची गर्दी मात्र वाढत गेली. आपापसात चर्चा, सगळं सोशल... आणि त्या हाणामारीत एका मुलाला प्राण गमवावा लागला. हे ज्याच्या हातून घडलं ते अशक्यप्राय सत्य प्रिन्स होता.
एव्हाना ही घटना वाऱ्यासारखी पसरली. ओरेलीपर्यंत येऊन ठेपली. तिची अवस्था गतप्राण झाल्यासारखीच. पण तिचा प्रिन्सवर पूर्ण विश्वास होता. तो निर्दोष सुटेल हा मनोमन विश्वासच मनाला गाठ बांधून गेला.
पण दैवलिखित काही वेगळंच होतं. आयुष्य क्षणभर थांबलं. कुणीतरी आयुष्याला फुलस्टॉप द्यावा तसं काहीतरी अघटित घडलं. प्रिन्सला जन्मठेपेची शिक्षा झाली. गजाआड सारी स्वप्न बंदिस्त झाली. ओरेली मात्र अजूनही तिच्या प्रेमावर ठाम होती. प्रिन्सचे आई-वडील, तर या धक्क्याने वयाच्या आधीच वाकून गेले. कर्ता मुलगा डोळ्यांदेखत शिक्षा भोगतो, ही घटना मनाला कात्री लावत होती. पण ओरेलीला तो परत येईल हा आत्मविश्वास होता. मात्र तिने कधीच ख्रिसमस साजरा केला नाही. कारण ही घटना घडली, तेव्हा ख्रिसमसचा सण सारे आनंदात साजरे करत होते. त्याच वेळी प्रिन्सच्या घरी मात्र दुःखाचा आक्रोश होत होता. ओरेलीने आज देवासमोर कॅन्डल लावली नाही आणि त्यानंतर कधीच नाही. ती फक्त वाट पाहत राहिली अनंतापर्यंत... नियमित प्रिन्सला भेटत असताना ती फक्त विश्वास देत होती, I am with u until I die... आणि हाच विश्वास प्रिन्सला जगवत होता.
ओरेली शिक्षण घेता घेता नर्सिंगला जॉइंट झाली. तिथला प्रवास चालू असतानाच तिचं प्रेम तिला जगण्याची उमेद देत होतं. आता ती स्वत:च्या पायावर उभी होती. घरच्यांनी तिच्या वागण्याचा कधी प्रतिकार केला नाही. कारण, एका छोट्या चुकीमुळे प्रिन्सचं आयुष्य बरबाद झालं याची जाण त्यांना होती. पण मुलीचं तारुण्य असं वाया जाताना समाजाला तोंड देणं फारच अवघड होऊन बसलं. पण तरीही केवळ मुलीच्या खुशीसाठी सारेच प्रसंगांना सामोरे जात होते.
असाच ३० वर्षांनी पुन्हा ख्रिसमस आला तो आनंदाची चाहुल घेऊन... चांगल्या वर्तणुकीमुळे प्रिन्सची शिक्षा कमी करण्यात आली. तो आता सुटणार होता for a long time, पण तितकीच ओढ त्याला ओरेलीला भेटण्याची होती. ओरेलीने वयाची ५२ वर्षं त्याची वाट पाहिली होती आणि अखेर तो क्षण आला. आज ओरेलीने देवासमोर कॅन्डल जाळली आणि खूप रडून देवाचे आभारही मानले. पुढे या दोघांनी लग्नाच्या बंधनात एकमेकांना अडकवलं. Hats off oreli... विकलांग मनाने पुन्हा जगण्यावर मात मिळवली...