रमेश तांबे
एके दिवशी एक माकड गेलं देवाकडे अन् म्हणालं, ‘देवा माझ्यावर असा अन्याय तू करतोस तरी कसा?’ देव म्हणाला, ‘झालं तरी काय, एवढं रागवायला. तुलादेखील दिलेत मी दोन डोळे, दोन कान, चार पाय अन् एक शेपूट! बाकीच्या माकडांना जसं दिलंय तेवढंच तुलाही दिलंय!’
माकड हसलं अन् म्हणालं, ‘देवा उगाचच जोक्स् नको मारू! माझ्या बोलण्याला उगाच नको हसू! माझा प्रश्न खूपच साधा, आतापर्यंत विचारलाय दहादा! काही माकडं झाली माणसं, मग मला का नाही तसा चान्स! मीच काय तुझं मारलंय घोडं! मीसुद्धा आहे ना तुझंच लेकरू, मग किती वेळा तुझी विनवणी करू! हे बघ देवा खरा असशील, तर मला माणूस बनवशील!’
देव म्हणाला, ‘माकडा खूप घाई करू नकोस. कारण एकदा का माणूस झालास, तर पुन्हा तुला माकड बनता येणार नाही! तू परत एकदा जंगल सोडून शहरात जा. पुन्हा एकदा माणसांचं जीवन जवळून बघ आणि मगच ठरव. पुन्हा आलास, तर तुला नक्कीच माणूस बनवीन जा तू आता.’
मग माकड गेलं लपत छपत मुंबईत. त्याने बघितल्या उंचच उंच इमारती, मोठमोठ्या गाड्यांमधून मजेत फिरणारी माणसं, त्याने पाहिली हॉटेलात विविध पदार्थांवर ताव मारणारी, समुद्र किनाऱ्यावर आनंदाने गप्पा मारत बसलेली माणसं, माकडानं गाड्या पाहिल्या, विमानं पाहिली, माणसांचं ऐशोआरामी जीवन बघून आपणही माणूसच बनायचं, असं त्यानं मनोमन ठरवलं!
दुसऱ्याच दिवशी माकड गेलं देवाकडे अन् म्हणालं, देवा विचार माझा ठरला, लगेच माणूस बनव मला. देव हसत हसत म्हणाला, माकडा विचार केलास ना नीट. माकड म्हणालं, हो हो देवा माझं डोकं आहे ठीक!
मग देवाने ‘तथास्तू!’ म्हणताच माकडाला खूप खूप आनंद झाला अन् काय आश्चर्य माकड झाला माणूस आणि जंगल सोडून आला थेट मुंबईच्या झोपडपट्टीत! झोपडपट्टी होती खूपच अस्वच्छ. जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग अन् वाहती गटारं! दारू पिऊन भांडणारी माणसं अन् कचाकचा भांडणाऱ्या बायका! खायला अन्न नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही. एक मळकी, गळकी झोपडी आली माकडाच्या वाट्याला त्यानं हात लावला कपाळाला. मनात म्हणाला, अरेरे हेच असतं का माणसाचं जीवन त्यापेक्षा बरे नाही का मरण! काम करा, पैसे मिळवा, मगच आपलं घर चालवा. माकड असताना मी वेगळीच माणसं बघितली, ते आणि हे किती वेगळं आहे यांचं जीवन!
महिनाभरातच माकड कंटाळलं अन् पुन्हा गेलं देवाकडं आणि म्हणालं! देवा देवा मला पुन्हा कर माकड, माणसाचं जीवन खूपच आहे अवघड. आपलं माकडाचं जीवन किती छान. आपण बरं अन् आपलं जंगल बरं. झाडावर राहायचं. हवं तेव्हा घर बदलायचं. ताजी ताजी फळं खायचं, झुळझुळणाऱ्या नदीचं गोड अन् स्वच्छ पाणी प्यायचं. खरंच घर नको की तो संसार नको. फक्त तेवढं जंगली प्राण्यांपासून सावध राहिलं म्हणजे झालं. मग माकडाचं जीवन म्हणजे मजाच मजा!
पण देव म्हणाला, नाही आता तुला पुन्हा माकड होता येणार नाही! तुला माणूस होण्याआधी दहा वेळा सांगितलं होतं, की नीट विचार कर. पण तू तर हट्टालाच पेटलास. आता तुला माणूस म्हणूनच जीवन जगावं लागेल! हो पण मी तुला रिकाम्या हातानं परत पाठवणार नाही. माकडांचे काही गुण मी तुला देतो. म्हणजे तुला तुझं माकड जीवन माणसाच्या रूपातदेखील जगता येईल. असं म्हणून देवानं पुन्हा एकदा तथास्तू म्हटलं! माकड माणूसच राहिला! पण देवाच्या आशीर्वादाचा परिणाम असा झाला की, तेव्हापासून माणूस ‘माकड चाळे’ करू लागला आणि माकडाकडे बघून त्याला खूप आनंद मिळू लागला!