
नागपूर (वृत्तसंस्था) : लंडनमधील बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतील ट्रायथलॉन क्रिडा प्रकारात महाराष्ट्राची कन्या संजना जोशी ही भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ही २२ वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनने १७ वर्षीय संजना जोशी हिची भारतीय संघात निवड केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झालेली संजना ही नागपुरातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिची स्प्रिंट अंतर ट्रायथलॉनसाठी निवड झाली. ट्रायथलॉन ही एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ज्यामध्ये खेळाडूंना पोहणे, नंतर सायकल चालवणे आणि नंतर शक्य तितक्या वेगाने मागे-पुढे धावणे आवश्यक आहे. स्प्रिंट अंतर ट्रायथलॉनमधील शर्यतीचे अंतर ७५० मीटर पोहणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे असे असते.
संजना ही डॉ. अमित समर्थ यांच्या अंतर्गत माइल्स एन मिलर्स एन्ड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. आणि विशेषतः संजना ही सोमलवार निकलस स्कूल, नागपूरची विद्यार्थिनी आहे. भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनने गेल्या महिन्यात चेन्नई येथे आयोजित केलेल्या निवड आणि मूल्यमापन शिबिरात तिने सहभाग घेतला होता.