Friday, March 21, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यलाडू सम्राज्ञी

लाडू सम्राज्ञी

अर्चना सोंडे

संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याला जणू पुजलेलाच आहे. या संघर्षाशी दोन हात करून जो यशस्वी होतो, तो खरा माणूस. ही बाब तिच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. निव्वळ दीड वर्षांत नियतीने दिलेले आघात पचवित ती उभी राहिली. तिने हार मानली नाही. उलटपक्षी त्या संकटांना सामोरे जाऊन तिने स्वत:चं उद्योग साम्राज्य उभारलं. लाडूचं साम्राज्य. या साम्राज्याची ती सम्राज्ञी झाली. फक्त महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे, तर अगदी परदेशातसुद्धा तिच्या लाडवांना मागणी आहे. ही लाडू सम्राज्ञी म्हणजे शैलीनच्या संचालिका वर्षा विजय म्हशीलकर.

वर्षा म्हणजे माहेरची शैलजा सुदाम वायंगणकर. हे वायंगणकर कुटुंब मूळचं कोकणातलं. शैलजाचे बाबा स्वयंपाक उत्तम तयार करायचे. त्यांच्या हाताला छान चव होती. पुढे शैलजाने हा वारसा जपला. शैलजाला एकूण तीन भाऊ. सुदाम वायंगणकरांनी शैलजाला पदवीधर केले. बी.कॉम. शिकून शैलजाने संगणकामध्ये देखील प्रावीण्य मिळवले. या अतिरिक्त ज्ञानाचा फायदा होऊन शैलजाला एका खासगी कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटरची नोकरीदेखील मिळाली. शिक्षणाबाबतीत मुलगा-मुलगी असा भेद न करता आपल्या मुलीला उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न सुदाम वायंगणकरांनी केला. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच शैलजा पदवीधर होऊ शकली होती. आई सुनिता वायंगणकर यांनी संस्काराची शिदोरी देऊन मोठ्ठं केलं.

कालांतराने शैलजाचा विवाह विजय म्हशीलकर या उमद्या तरुणासोबत झाला आणि शैलजा वायंगणकर वर्षा विजय म्हशीलकर झाली. विजय हे खासगी कंपनीमध्ये कार्यरत होते. म्हशीलकर कुटुंब हे संयुक्त कुटुंब होते. मात्र बिऱ्हाड वाढल्याने जागा अपुरी पडू लागली. विजय यांनी खारघरला घर घेतले आणि २००२ मध्ये हे कुटुंब करी रोडवरून खारघरला स्थलांतरित झाले. नवीन परिसर, भोवतालची नवीन माणसे याची सवय वर्षाला नव्हती. मात्र विजय यांनी वर्षाला बाहेरचं जग पाहण्याचा नवीन दृष्टिकोन दिला.

दरम्यान वर्षाला साक्षी आणि सुजल अशी दोन अपत्ये झाली. “तू एवढी शिकलीयेस, ते काय घरी राहायला का…?” असे प्रश्न अनेकजण तिला विचारायचे. तिच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि अनुभवानुसार तिला कोणत्याही कंपनीत सहज नोकरी मिळाली असती. मात्र आपल्या चिमुकल्यांना वाढवायचं, त्यांचं संगोपन करायचं हा पर्याय तिने निवडला. त्यानुसार तिने स्वखुशीने आपल्या मातृत्वाला प्राधान्य दिले होते. सुजल सातवीत असताना तो दुर्दैवी प्रसंग घडला. एक जीवघेण्या आजाराने त्याला गाठले. वर्षा आणि विजय यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. नियतीने या प्रयत्नांची दखल घेत सुजलला जीवनदान दिले. आता कुठे नीट होईल असं वाटत असताना विजय यांना देखील मलेरिया, डेंग्यूसारख्या आजाराने ग्रासले. वर्षाने त्यांची देखील रात्रंदिवस जागून सेवा केली. त्यानंतर वर्षाचे बाबा, सुदाम हे आजारी पडले. दुर्दैवाने ते आजारातून वाचू शकले नाही.

सुदाम वायंगणकर हे वर्षाचे आदर्श होते. एक प्रकारे दैवतच होतं. आईपेक्षा वर्षाचा ओढा बाबांकडेच होता, सुदाम हे उत्तम स्वयंपाक तयार करायचे. ते सारे गुण वर्षामध्ये आले होते. पुरणपोळी तर अगदी हुबेहूब बनवते. बाबांच्या निधनाने वर्षा खचली. मुलगा सुजल आणि पती विजय यांचं आजारपण त्यानंतर वडील सुदाम यांचं निधन हे सारं काही अवघ्या वर्ष- दीड वर्षांच्या कालावधीत घडलं होतं. यातून वर्षाला बाहेर काढलं ते लाडूने. तसं पाहिल्यास वर्षा उत्तम पद्धतीचे लाडू, मसाले तयार करते हे तिच्या वर्तुळातील लोकांना ठाऊक होते. अशाच एका मैत्रिणीने वर्षाला एक किलो मेथीचे लाडू तयार करण्याची ऑर्डर दिली. एवढी चांगली संधी दवडू नकोस, असे विजय यांनी वर्षाला सांगितले. त्यांनी स्वत: वर्षाला लाडू तयार करण्यासाठी मदत केली.

३२ लाडूंची ती ऑर्डर यशस्वी ठरली. त्यानंतर लाडूसाठी ऑर्डर्स येत राहिल्या. पाच धान्याचा पौष्टिक लाडू, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, नाचणीचे लाडू अशा प्रकारे लाडूंचे प्रकार वाढू लागले. साक्षी आणि सुजल देखील मदत करू लागले. रवा लाडू, बेसन लाडू, अळीव लाडू, शेंगदाणा लाडू अशा प्रकारांची भर पडून आता १० विविध प्रकारचे लाडू तयार होतात. हे सारे लाडू पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात. खास पश्चिम महाराष्ट्रातून पौष्टिक असा काळा गूळ वापरला जातो. सोबत देशी गायीचे शुद्ध तूप सुद्धा. पारंपरिक पद्धतीने तयार करण्याची ही प्रक्रिया पाहून शैलीन हे नाव एका ग्राहकानेच सुचवलं. हा शब्द मूळचा लॅटिन. आता याच नावाने वर्षा म्हशीलकर आपले उत्पादन तयार करतात.

लाडूसोबतच पोहा चिवडा, मका चिवडा, भाजणी चकली, शेव, करंजी हे नमकीनचे प्रकार तर मालवणी मसाला, कोल्हापुरी मसाला, संडे मसाला, आगरी मसाला, गरम मसाला, काश्मिरी मिर्च पावडर, सेलम हळद, कुळीथ पीठ असे प्रकार शैलीन उत्पादित करते. अन्न व औषध विभागाच्या परवान्यासोबत इतर आवश्यक परवाने शैलीनकडे आहेत. २०१८ मध्ये जागतिक व्यापार केंद्रात झालेल्या व्यावसायिक प्रदर्शनात ते सहभागी झाले होते. कॉर्पोरेट गिफ्टिंगसोबतच अमेरिका, इंग्लंड, स्वीडन, दुबई अशा परदेशात देखील शैलीनच्या उत्पादनांना मागणी आहे. भविष्यात दुकान घेऊन पारंपरिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने विक्री करण्याचा वर्षा यांचा मानस आहे.

“माझ्या या उद्योजकीय प्रवासात माझे बाबा सुदाम, पती विजय, साक्षी आणि सुजल ही माझी मुले, झेप संस्थेच्या संस्थापिका पूर्णिमा शिरीषकर या सगळ्यांचे योगदान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्यांनी केलेल्या अनमोल सहकार्यामुळेच हा प्रवास शक्य झाला,” अशा शब्दांत वर्षा म्हशीलकर कृतज्ञता व्यक्त करतात.

संघर्षाला कुटुंबाची सोबत असेल, तर कोणतीही लेडी बॉस यशस्वी ठरते. लाडू सम्राज्ञी वर्षा म्हशीलकर त्यांचं उत्तम
उदाहरण आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -