अॅड. रिया करंजकर
‘शादी का लड्डू खाये तो भी पछताए, नहीं खाये तो भी पछताए’ अशी परिस्थिती कधी कधी नाही, तर सर्रास आजूबाजूला आपल्याला जाणवते. लग्नात असं होतं की, काही वेळा मुलांचे निर्णय चुकतात, तर काही लग्नांमध्ये आई-वडिलांचे निर्णय चुकतात. पण या चुकलेल्या निर्णयांमध्ये सामोरे जावे लागते, ते लग्न झालेल्या जोडप्यांना. जास्त करून अनेक अडचणी आणि समस्या निर्माण होतात त्या स्त्री जातीला. समाज अशा स्त्रीला काही वेळा समाजात जगणेही मुश्कील करून ठेवतो.
भारती बारावी झालेली सुशिक्षित मुलगी. औषध कंपनीमध्ये कामाला. स्वबळावर जगणारी. तिचं लग्न राजेश नावाच्या व्यक्तीशी तिच्या घरातल्यांनी करून दिलं. ती खूश होती की, आपल्यासाठी घरातल्यांनी निवडलेला मुलगा हा चांगलाच असणार. संसाराला सुरुवात झाली. पहिले दिवस खरंच चांगले गेले. मजेत गेले. पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले, तसं तिला राजेशमधले अवगुण समजू लागले. सुरुवातीला तो कामधंदा करत होता. पण आता तर तो कामधंदा सोडून घरी बसलेला होता आणि ती सासरी नांदायला गेल्यावर तिला हळूहळू समजू लागलं की, राजेश हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता. आजूबाजूच्या एरियात जाऊन तो आपली गुंडगिरी करत होता. भारती कामाला गेल्यावर राजेश कामाला जात असेल, असे तिला वाटे. पण तो कामाला जात नसे. घरी आल्यानंतर भारतीच्या पर्समधले पैसे तो चोरत असे. नवरा अशा प्रवृत्तीचा होता. पण नवऱ्याच्या घरातील लोक खरंच चांगली होती म्हणून भारतीने पाच वर्षे त्याच्याबरोबर संसार केला. किती वर्षं असंच चालू राहणार, हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. त्या नवऱ्याला किती वर्षं पोसायचं, असं तिला वाटू लागलं म्हणून दोन्ही घरातल्या लोकांची मीटिंग घेतली व राजेश असा वागतो. “किती वर्षे मी त्याच्यासोबत असेच राहू”, असा प्रश्न भारतीने केला. त्या वेळी घरातल्यांनी निर्णय घेतला की, या दोघांना घटस्फोट घेतला पाहिजे आणि त्यामुळे भारतीच्या भावाने तिला माहेरी आणलं.
दोन महिने ती भावाकडे राहिली आणि त्याच दरम्यान त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला. त्याचदरम्यान भारतीला ओळखीच्या अशा व्यक्तीने स्थळ आणलं. भारती नको बोलत होती. माझा पहिला घटस्फोट होऊ दे, मग बघू. पण घरातले लोक काय ऐकणार? मुलगा चांगला आहे, काय बघूया मग ठरवू, असा विचार घरातल्यांनी केला. भारतीने विचार केला की, आपण तरी किती दिवस दादा-वहिनीच्या सोबत राहणार? तिनेही या गोष्टीला होकार दिला. भारतीला बघायला संपत आला व त्याच्यासोबत त्याच्या घरातील आई आणि बहिणी आल्या. भारती तशी अंगाने धिप्पाड होती. शरीर जाड होतं, तिला वाटलं, आपल्याला मुलगा पसंत करणार नाही. पण मुलाकडून पसंती आली. त्यावेळी मुलाकडच्या लोकांना पुन्हा भारतीकडूनच्या लोकांना बोलावलं आणि तिचा घटस्फोटाचा अर्ज कोर्टात निर्णयासाठी आहे, असं सांगितलं. तो निर्णय झाला की, आपण लग्न करून देऊ, असं भारतीच्या घरातल्या लोकांनी सांगितलं. त्यावेळी संपतचा घरातल्या लोकांनी अर्ज दाखल केलाय ना मग बस झालं, असं सांगितलं व आम्हाला होळीला गावाला जायचं आहे. लवकरात लवकर लग्न करूया, असा नवऱ्याकडच्या लोकांनी निर्णय घेतला. साड्या घ्यायला गेल्यावर संपत अडखळत का चालतो, याबद्दल विचारले असता “पायाला ठेच लागली म्हणून असे चालतो”, असं नवरदेवाने उत्तर दिलं.
लग्न व्यवस्थित असं पार पाडलं. भारती नांदायला नवऱ्याकडे गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की, संपत अजून लंगडत आहे. त्यात तिने प्रश्न केला की, “तुम्हाला अजून पायाला ठेच लागलेली आहे का?” त्यावेळी संपतने सांगितलं की, “लहानपणी माझ्या मानेच्या नसीला प्रॉब्लेम झाल्यामुळे माझ्या एका साइडला प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे माझा एक हात आणि पाय लुळा झालेला आहे. ऐकल्यावर भारतीला धक्काच बसला. मनाशी म्हणाली, जाऊ दे पहिला नवरा काही कमी होत नव्हता. येथे तरी काहीतरी मिळकत आहे, असा तिने विचार केला व संसार करू लागली.
पण सासू आणि नणंदने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. संध्याकाळचं जेवण करताना लाइट लावायचे नाही आणि तिने लाइट लावून जेवण करायला लागली, तर जेवण करताना लाइट बंद करायची. असं तिला छळण्यात येऊ लागलं. तिची परमनंट नोकरी तिला सोडायला लावली. घाण-घाण शिव्या सासू आणि नणंद नि नवरा तिला घालू लागले. घरात थुंकून तिला साफ करायला लावत होते. एवढंच नाही, तर लॉकडाऊनचा पहिला काळ होता. कोरोनामुळे सगळेजण आपापल्या घरात अडकलेले होते आणि त्याच दरम्यान सासूने तिच्याकडचा फोन आपल्या ताब्यात ठेवलेला होता. त्यामुळे तिला आपल्या भावाला, वहिनीला, वडिलांना फोन करता येत नव्हता, त्यांची चौकशी करता येत नव्हती. शरीराने जाड होती म्हणून तिला सतत जाडी असं संबोधलं जायचं. “आम्हाला जाडी मुलगी नको होती. चार-पाच पोरांची आई वाटतेस”, असे नको त्या शब्दांमध्ये तिची छळवणूक सुरू केली. ती बोलायची, मागणी घालायला आले तेव्हा तुम्ही मला बघितलं होतात, त्यामुळे तुम्हाला जाडी दिसली नाही का? सासू बोलायची मुलाला पसंत आली म्हणून केली. पण आता आम्हाला नको आहे. तिने कधी ऐकले नव्हते असे घाणेरडे शब्द तिला ऐकावे लागत होते. एक दिवस तिने आपला फोन शोधला आणि जिथे पहिली नोकरी करत होती. तिथल्या साहेबांना “मला कसंही करून तुम्ही माझ्या माहेरी सोडा”, असं सांगितलं.
लॉकडाऊनमध्ये कोणते साधन येण्या-जाण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्या सरांच्या मदतीने अंगावरच्या कपड्यानिशी भारती आपल्या भावाकडे माहेरी आली. तिने सर्व झालेला प्रकार आपल्या भावाला सांगितला. भावाने आणि भावजयीने लग्न ठरवलं, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. तिचं लग्न ठरलं होतं. तिने तिच्या सासूला फोन केला, त्यावेळी भारतीची सासू म्हणाली आम्हाला जाडी मुलगी नको. गेली ती बरं झाली आणि आता मला एक सडपातळ बारीक मुलगी माझ्या मुलासाठी बघ, असं उद्धटपणे उत्तर सासूने त्या स्त्रीला दिलं.
भारतीच्या घरातील लोक पोलीस स्टेशनला कम्प्लेंट करायला गेले. त्यावेळी संपत आणि त्याच्या घरातल्या लोकांना पोलिसांनी बोलावलं. त्या व्यक्तीने भांडण करून आम्हाला हिला नांदवायचं नाही, असं सांगितलं. आम्हाला जाडजूड मुलगी नको. म्हणून भारतीने अंतर्गत कोर्टात अर्ज दाखल केला व संपत जेव्हा कोर्टात हजर झाला, त्यावेळी त्यांचं कौन्सिलिंग करण्यात आलं. त्यावेळी कौन्सिलरने त्यांना नांदायला न्या आणि व्यवस्थित नांदवा सांगितलं. त्यावेळी संपत बोलला, “मला नांदवायची नाही. ही माझी बायको नाही. कारण पहिला तिचा घटस्फोट झालेला नसताना माझ्याशी तिने लग्न केले” तिने आमची फसवणूक केलेली आहे”, असं तो बोलू लागला.
भारतीने सांगितले, “आम्ही तुम्हाला कागदपत्र दाखवलेली होती. तुम्हाला लग्नाची घाई लागली होती. घटस्फोटापर्यंत तुम्ही थांबायला तयार नव्हता, आम्हाला घाई नव्हती.” त्यावेळी कौन्सिलरने “आता तिचा घटस्फोट झालेला आहे ना” असं त्यांना समजावलं. “तुम्ही त्यांना पोटगीसाठी अमुकअमुक रक्कम द्या”, त्यावेळी ही रक्कम द्यावी लागते म्हणून त्यांनी थोडा वेळ घेतला आणि दुसऱ्या मीटिंगच्या वेळी “मी नांदायला तयार आहे”, असं तो सांगू लागला. त्यावेळी भारतीच्या वकिलांनी हा प्रश्न केला की, “तुम्ही जर नांदवायला नेलं असतं पोलीस स्टेशनच्यामार्फत, तर आज ही वेळ आली नसती. भारती बोलली की, “मी सगळ्या गोष्टी सहन केल्या असत्या. पण माझ्या शरीरावरून मला जे बोलणे ऐकावे लागतात, ते मला सहन होत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्यासोबत नांदायचं नाही मी नांदायला तयार होती, जर यांनी मला पोलीस स्टेशनवरूनच घेऊन गेले असते तर. पण आता तर मला ते काय काय बोलले आहेत. ते मी सहन करू शकत नाही” आणि त्यावेळी पुन्हा तिचा उभा राहिलेला संसार मोडकळीस आला.
घाईघाईने विचार न करता भारतीचं लग्न जमवून दिलं होतं. त्याचे परिणाम मात्र भारतीला आयुष्यभर सहन करावे लागत आहेत. तिची चूक नसताना २ लग्नांचा ठप्पा तिच्या माथ्यावर बसला.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत.)