डॉ. स्वप्नजा मोहिते
ओ हाय! हाऊ आर यू? खिडकीतून चुकारपणे आत येणाऱ्या पावसाच्या तुषारांसोबत तिचा प्रश्न. गोबऱ्या गालावर रुळणाऱ्या केसांतून पावसाचे मोती लगडलेत. मागे मस्त बरसणारा पाऊस! शांतपणे झरणारा! पाना-पानांतून तो अलवार झेपावतोय जमिनीकडे… मातीचा मस्त सुगंध हवेत भरून उरलाय आणि तळव्यावर पडणाऱ्या पागोळ्यांचे थेंब झेलत, ती आणि मी मस्त भिजतोय. ती… माझी मनातली सखी… मी एकटी असताना मला सोबत करणारी, असं माझं माझ्याच सोबत राहणं खूप भावतं मला. मग मी तिच्यासोबत माझे क्षण एन्जॉय करत असे! आत्ताही… ती अन् मी…पावसात… आपल्याच सोबत!
समोरच्या तारेवरून ओघळणारे पाऊसमणी सरकत एकत्र येतात आणि ट्रॅपीझवरून झुलणाऱ्या पऱ्यांप्रमाणे अलगद झेपावत राहतात. त्यांच्यावरून सरकत माझी नजर रेंगाळते मागच्या कवाड तुटलेल्या घराकडे. पायरीवर बसून ती, अपलक न्याहाळतेय पाऊस… नजर न हलवता. पाऊस तिच्याही छपरावर वाजतोय… पत्र्यावरल्या तुटलेल्या भगदाडातून निर्व्याजपणे तिच्या झोपडीत शिरतोय. कुठून कुठून गोळा केलेल्या प्लास्टिकच्या रंगीबेरंगी तुकड्यांनी तिचं छप्पर सजलंय! काही दिवसांपूर्वी ती आणि तिचं कुटुंब, माझ्या समोरच्या माळरानावर उतरलंय. चार बांबू आणि पत्रे लावून तिचं ते घर बनलंय. त्यावर तिनं आणि तिच्या आईनं रंगीबेरंगी प्लास्टिकचे तुकडे टाकून आणखी आडोसा केलाय. मी रोज तिच्या झोपडीची केली जाणारी डागडुजी पाहतेय. त्या मोकाट माळरानावर तिची ती झोपडी रंगीत फुलांच्या ताटव्यागत भासते. अन्नाच्या आशेनं आलेली चार कुत्री, तिच्या झोपडीच्या आडोशाला झोपलेली असतात. त्यातल्या एका कुत्रीनं मागच्या बाजूला चार गोंडस पिल्लांना जन्म दिलाय. त्यांची ती कोवळी कुरबूर, दुधासाठी चाललेली धडपड मला माझ्या अंगणातूनही जाणवते. त्यातलं एक शुभ्र पांढरं, लोकरीच्या गोळ्यागत दिसणार पिल्लू तिनंच मला हळूच उचलून दाखवलं होतं काल! म्हणजे मी त्याच्या घराकडेच बघत असते हे समजलंय बहुतेक तिला!
तिच्या चेहऱ्यावर तेव्हा मला माझ्या सखीचं निर्व्याज हळवं हसू दिसलं. “ताई, तुला हवंय हे पिल्लू?” तिनं शुद्ध भाषेत मला विचारलं तेव्हा मी उडालेच! त्या पिल्लांपेक्षा मला तेव्हा ती जास्तच भावली. तिच्या भुऱ्या कुरळ्या केसात सोनेरी किरणं अडकलेली तेव्हा! तिचा उन्हानं टॅन झालेला चेहरा, तिचे तपकिरी पिंगट डोळे आणि त्यामागची ती उन्हाची मस्त सोनेरी आभा… गोष्टीतल्या सोनपरीसारखी दिसत होती ती तेव्हा! माझ्या घराच्या गॅलरीतून बघताना ती, तिची झोपडी आणि तिच्या मांडीवरच ते गोजिरवाणं पिल्लू, मला व्हॅन गॉहच्या पेंटिंगची आठवण करून देत राहिले तेव्हा!
कसं आहे नं? मी मस्त माझ्या छानशा घरात, माझ्या क्षणांच्या आठवणींच्या सोबत… आणि ती… जगतेय तिच्या मस्तीत… जिंदगीच्या तालासुरात… आपल्याच नादात! “तुला कंटाळा नाही येत, या अशा गावोगावी फिरण्याचा?” ती त्या दिवशी पिल्लाला सोबत घेऊन अंगणात आली माझ्या, तेव्हा राहवलंच नाही मला. “हं! येतो नं कंटाळा! पण मजा पण येते!” अगदी मोठ्या माणसासारखं तिचं उत्तर. तिच्या गडद तपकिरी, भोकरासारख्या डोळ्यांत जग बघितल्याचा अनुभव बोलत होता. नवी गावं बघायला मिळतात. नवं काय काय समजतं! तिचे आई-वडील बांधकाम मजूर होते. कंत्राटदारानं सांगितलं त्या गावाला जायचं… घरं बांधायचं काम करायचं… घर पूर्ण झालं की बाडबिस्तारा आवरून पुन्हा नवं गाव, नवी बिल्डिंग…नवा रोजगार!
“अगं पण तू इतकं छान कसं बोलतेस?” माझं कुतूहल कुठलं मेलं मला गप्प बसू देतंय? खिडकीच्या तावदानाला नाक चिकटवून, माझी सखी माझ्याकडे रागानं बघतेय. आपलं अपर नाक उडवत ती आपली नापसंती दर्शवते. तुला काय करायचाय हा चोंबडेपणा… तिच्या मनातले भाव मला स्पष्टपणे कळतात. गेलीस उडत… मी नाक मुरडत परत माझ्या या नव्या मैत्रिणीकडे वळते. “मी रस्त्यावरच्या शाळेत शिकते… जिथे मिळेल तिथे…. जमेल तसं. कुठे कुठे भरते अशी शाळा माझ्यासारख्या मुलांसाठी! मागल्या… अहं… मागच्या गावात होती तशी शाळा! मला खूप आवडतं शाळेत जायला.” ती दूर कुठेतरी बघत बोलली. तिच्या नजरेत ते शाळेचं स्वप्न तरळत होतं तेव्हा. “मला कविता पण येते… बाईंनी शिकवली होती. म्हणू?” माझ्या परवानगीची वाटही न बघता ती कविता म्हणायला… सॉरी… गायला लागते…
“गवत फुला रे गवत फुला… असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा…!!” माय गॉड !! अंगावर असा सरसरून शहारा आला माझ्या! मन एकदम शाळेतल्या त्या बाकावर जाऊन पोहोचलं माझं! समोर मेहेंदळे बाई उभ्या राहिल्या. त्यांचं ते तालासुरात शिकवणं… एक विस्तीर्ण माळरान… त्यातल्या उन्हानं पिवळ्या पडत जाणाऱ्या गवतावर डुलणारं एक नाजूकसं गवताचं फुलं… सूर्याकडे पाहून हसणारं… अगदी हिच्यासारखंच!! अरे हे तर माझ्याही आयुष्यातले हळवे, कोमल क्षण आहेत! तिच्याही वाट्याला आलेले… मला परत जगावेसे वाटणारे!
बारिश में रख दू जिंदगी को
ताकि धूल जाये पन्नो की स्याही
जिंदगी फिरसे… कई बार…
लिखने का मन करता हैं कभी कभी…!
चलो जिंदगी फिरसे लिखते हैं! मी नव्या नजरेनं तिच्याकडे पाहतेय. पिल्लाला खेळवत, ती माझ्याकडे बघून हसते… तेच ते निर्व्याज, निखळ… मन को छू लेनेवाली हंसी! तिला शिकायचंय आणि गाव गाव फिरायचंही आहे. आता या गावात अशी रस्त्यावरची शाळा भरते का? हा तिच्यासमोरचा मोठ्ठा प्रश्न आहे. बंदिस्त भिंतीआडच्या शाळेत कोण घेणार मला? पण शिकण्यासाठी शाळा भिंतींआडचं हवी का हा माझा प्रश्न! तिच्यासारखे कितीजण या रस्त्यावरच्या शाळेचा पत्ता शोधत असतील? या प्रश्नाचं ओझं मला अस्वस्थ करतंय.
तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूँ मैं!
जिने के लिये सोचा ही नहीं, दर्द सँभालने होंगे
मुस्कुराये तो, मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे
मुस्कुराऊ तो यूँ लगता हैं,
जैसे होठों पर कर्ज रखा हो!
हे कुठलं कर्ज संभाळतेय मी? हा कुठला दर्द… कुठला एहसास? मी बंद भिंतीच्या शाळेत शिकल्याचा? रस्त्यावर ही शाळा भरते हे माहीत नसल्याचा? आजूबाजूला वेगात धावणाऱ्या बाहेरच्या जगाची पर्वा नसलेल्या गाड्या… त्यांचे कर्णकर्कश्श हॉर्न्स वाजत आहेत. उडणारी धूळ आणि धुराचं गच्च साम्राज्य माझ्या आजूबाजूला हातपाय पसरत चाललं आहे. रस्त्याच्या आडोशाला असणारी डबकी आणि चिरगुटात गुरफटून पडलेले जीव, फेरीवाले, हातगाडीवाले आणि कोण कोण… आणि त्यात भरलेली ती शाळा! कोणीतरी मनापासून गातंय… कविता म्हणतंय… ‘गवत फुला रे गवत फुला…’ समोर बसलेल्या सरमिसळ वयाच्या मुलांना फक्त तेच ऐकू येतंय… समजतंय! खुडून टाकलेली कितीतरी गवत फुलं त्या तालावर डोलताहेत… रद्दीतून मिळालेल्या वह्यांवर अक्षरं उमटत आहेत… ‘गवत फुला रे गवत फुला!’