नवी मुंबई (प्रतिनिधी) : प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जीवघेणे आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या १ लाख ९६ हजार उंदरांचा खात्मा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मूषक नियंत्रण विभागाने केला आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत ‘मूषक नियंत्रण’ विभागाच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
पालिकेकडून शहरातील नागरिक रोगमुक्त राहावेत, म्हणून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये स्वच्छ अभियान अंतर्गत शहरात घुशी व उंदरावर प्रतिबंध यावे म्हणून झिरो कचरा कुंडी ही अभिनव योजना राबविली. तसेच हागणदारी मुक्त शहर व्हावे, या उद्देशाने स्वच्छ भारत अभियानास सुरुवात झाल्यापासून मागील सहा वर्षे घनकचरा व्यवस्थापन प्रशासन अविरत मेहनत घेत आहेत. त्यातच मूषकामुळे रोगराईला आमंत्रण मिळू नये, हा प्रमुख हेतू समोर ठेवून मागील एक वर्षात दोन लाखांच्या आसपास उंदरांचा खात्मा मूषक नियंत्रण विभागाकडून करण्यात आला आहे.
नवी मुंबईत उंदरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उंदरामुळे नवी मुंबईकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर पालिकेने उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मूषक नियंत्रण विभाग स्थापन केला आहे. वाढत्या उंदरांच्या संख्येला आळा बसवण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या या ठिकाणी विषारी गोळ्या टाकून उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. झोपडपट्टी किंवा गावठाणामध्ये गटारीतच किंवा उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे उंदीर, घुशीला खाद्य मिळत आहे.
उंदीर, घुशीचे प्रमाण झोपडपट्टी व गावठाण भागात अधिक आहे. मूषक पकडण्याठी अॅल्युमिनियम फॉस्फाइट, झिंक फॉस्फाइट, ब्रोमेडिओलॉनी केक अशा औषधांचा वापर करून त्यांचा खात्मा करण्यात येतो. तर पिंजरे, ग्ल्यूटेप, धुरीकरण करूनही उंदरांना मारले जाते. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांना दंडही ठोठावण्यात आला आहे.
मूषक नियंत्रण मोहिमेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला २ लाख २३ हजार ५८० रुपयांचा दंड लावण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांनी दिली.