माधवी घारपुरे
तन्मयची KVPY (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) ची परीक्षा आज होती. मुळातच हुशार आणि आऊटस्टँडिंग करिअर त्याची असल्यामुळे यशाची खात्री तनुजाला होती. श्री आणि सरस्वती दोघी तिच्या घरी नांदत होत्या आणि त्या गोष्टींचा अहंकार तिच्या चेहऱ्यावर सतत असे. तन्मयचा नंबर दादरच्या कॉलेजवर आला होता. पेपर ऑनलाइन होता, पण सेंटरवर जाणे भाग होते. साडेनऊ ते साडेबारा पेपर. तनुजा तिच्याच स्टेटसच्या तिच्या मैत्रिणीबरोबर तिच्या मुलालाही घेऊन चालली होती. मुलुंड सोडले आणि वाटेतच पुढे गाडीचे ब्रेक फेल झाले. त्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार होता. तनुजाने ओला बुक करायचा खूप प्रयत्न केला, पण ओला बुक होईना. शेवटी मुलुंड स्टेशनवरून लोकलने जायचे ठरले आणि घाईघाईने ते चौघेजण स्टेशनवर आले. ४ फर्स्ट क्लास दादर मागण्याऐवजी घाईत तिने ४ दादर सांगितले. प्लॅटफॉर्मवर आल्यावर कळले की तिकीट साधे आहे. आता परत करण्याइतका वेळ नव्हता. तनुजाला मनस्वी चीड आली, पण नाईलाज होता. मैत्रीण पण रागावली “आपण इतक्या गर्दीत कधी जातो का? तू पर्फेक्शनिस्ट आहेस ना? मग असं कसं घडलं?”
तनुजाने मुकाट्याने ऐकून घेतलं आणि आलेल्या गाडीत घाम पुसत पुसत चौघेजण चढले. “कसाबसा प्रवेश मिळालाच तनू! थँक गॉड! मुलांना वाचता तर येणार नाही. निदान त्यांना उभ्याउभ्याने का होईना, ब्रेकफास्ट तरी खाऊ देत” मैत्रिणीचा सल्ला. तनुजा मनात म्हणत होती, “कशा काय बायका लटकत जातात देव जाणे!” एकमेकींचा घाम पदरानं, पर्सनं लागतो, किती किळस येते? पण नाइलाज को क्या इलाज?
तनुजाने आणि तिच्या मैत्रिणीने पर्समधून कसेतरी डबे काढले. तन्मयचा आवडता शिरा आणि लिंबाचं लोणचं होतं. साडेबारानंतर कोहिनूरला जेवायचं आणि घरी ठाण्याला परत यायचं, असा बेत होता. गर्दीत तनुजाने डबा उघडून तन्मयच्या हातात देताना मधल्या बाईचा हात वर आला आणि डबा उलटा झाला. कुणाच्या पर्सवर, कुणाच्या हातावर, कुणाच्या मेकअपच्या चेहऱ्यावर तो सांडला.
साडीवर सांडलं. रंगाचा बेरंग झाला, पण त्याहीपेक्षा तनूला वाईट वाटलं की, उपाशी पोटानं हा पेपर काय सोडवणार? तिनं मोठ्या आशेने डबडबलेल्या डोळ्यांनी मैत्रिणीकडे पाहिलं. तोपर्यंत तिच्या मुलाने डबा खायला सुरुवात केली होती. ती म्हणाली, “तनू, मला उशीर झाल्याने मी कालच्याच दोन पोळ्या आणल्यात.
तू शिळं देतेस का?” असं म्हणताना मैत्रिणीने मुलाला “लवकर खा” अशी खूण केलेली तनुजाच्या चाणाक्ष नजरेने टिपली. तन्मय काहीतरी ज्युस वगैरे… ‘डोन्ट वरी’ असं म्हणून टिश्यू पेपरने साडीवरचे लोणचे पुसू लागली.
समोरचा चाललेला सगळा प्रकार लोकलमध्ये विंडो सीटवर कर्जतहूनच बसून आलेली एक स्त्री जी अतिसामान्य होती, सामान्य घरातली होती, ती पाहत होती. सातच्या आधीच निघालेली असल्याने तिने धपाटे आणि लोणी बांधून घेतले होते. ती KVPY च्या परीक्षेसाठीच मुलाला घेऊन निघाली होती. ती सारखी बोलू की नको! या विचारात गुरफटली होती. थोडे धाडस करूनच ती तनुजाला म्हणाली,
“मॅडम, एकूण तुमच्याकडे पाहून विचारावे कसे? या विचारात मी होते, पण मीही याच परीक्षेसाठी माझ्या रोहितबरोबर चालले आहे. भुकेल्यापोटी आपला मुलगा पेपर देतो ही गोष्ट आई नावाच्या प्राण्याच्या काळजाला टोचणारी आहे.” “माझ्याकडे एक धपाटा आहे. एक रोहित खाईल, एक तन्मय, लोणी ताजं आहे. तन्मयला आणि तुम्हाला चालेल? दोघांनी अर्ध अर्ध खाल्लं तरी पोटाला शांतता येईल.”
“आई धपाटा काय प्रकार आहे?” तन्मय.
“आमच्या लहानपणी आई द्यायची मला करून. छान लागतो, खाऊन बघ.” तनुजा.
रोहितच्या आईने तन्मयला ‘लोणी आणि धपाटा’ दिला. तन्मयने इतक्या आवडीने खाल्ला की तो म्हणाला, “आई झोमॅटोवरून पिझ्झा, बर्गर आणल्यापेक्षा मस्त, टेस्टी! वा! ग्रेट!!!”
तन्मयचे हे बोलणे ऐकून रोहितच्या आईला आनंद तर झालाच. पण तनुजालाच ढेकर आलेला ऐकून तिच्या अंगभर समाधान चमकून गेलं.
दादरला गाडी वेळेत पोहोचली, त्या सगळ्या सेंटरवरच आल्या. मुले व्यवस्थित शांतपणे पेपरला गेली. रोहितची आई तिथून कामावर गेली. तनुजा आणि तिची मैत्रीण बाहेर गार्डनमध्ये बसून होत्या. तनुजा म्हणाली, “वीणा तू तुझं पुस्तक वाच. मी मात्र माझ्या उद्याच्या लेक्चरची तयारी करते.” तिच्या बोलण्यात एक प्रकारचा कोरडेपणा आला होता. वीणाला ते कळले, मनाला लागले आणि आपल्या स्वार्थाचा पराभव एक प्रकारे रोहितच्या आईने केला होता.
खलील जिब्रानच्या काही विशिष्ट तत्त्वांवर तनुला बोलायचं होतं. तिने दोन-तीन पुस्तके पर्समधून बाहेर काढली. पण ते उघडण्यापूर्वीच तिच्या शिक्षकांनी सांगितलेली खलील जिब्रानची गोष्ट आठवली. ते म्हणाले होते, कुरूपतेतील सुरूपता आणि सुव्यवस्थेतील कुरूपता दोघी बहिणी-बहिणी एकदा पुष्करिणीवर स्नानास गेल्या. दोघींची वस्त्रे काठावर होती. कुरूपतेच्या मनात विचार आला की, सगळीजणं एका सुरूपतेचेच कौतुक करतात. माझ्याकडे दुर्लक्ष करतात. तिच्या मनात दुष्ट विचार आला. ती पुष्करिणीतून बाहेर आली. काठावरचे सुरूपतेचे कपडे परिधान केले आणि निघून गेली. सुरूपता हाका मारत होती, पण कुरूपतेने लक्षच दिले नाही. तिला बाहेर आल्यावर कुरूपतेचे कपडे घालण्यावाचून पर्याय राहिला नाही. ती गेली ब्रह्मदेवाकडे आणि म्हणाली, “आता मी काय करू? मला सगळीजण आता कुरूपच म्हणतील”
ब्रम्हदेव उत्तरले, “बेटा काळजी करू नका. आजपर्यंत सगळे जग तुम्हा दोघींनाही चांगले ओळखते आणि मी खात्रीने सांगतो की, कुरूपतेच्या देवीने सौंदर्यदेवीची वस्त्रे घातली तरी दुनियेतला सुजाण तिला बाजूला केल्याशिवाय राहत नाही.” तनुजा उभी आडवी मोहरून गेली.
एकीकडे होती रोहितची आई, तर दुसरीकडे होती वीणा!
ही होती ‘धपाट्याची’ करामत…!