Share

अनघा निकम-मगदूम

शाळेमध्ये शिकवल्याप्रमाणे कोकणात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा असतो. पण उन्हाळ्याच्या खऱ्या अर्थाने कडक झळा पोहोचतात त्या एप्रिलपासूनच! मे महिन्याच्या पहिल्या साधारण १५ दिवसांपर्यंत हा कडक उन्हाळा अंगाची लाहीलाही करत असतोच. पण मे महिना सुरू होतो तसतशी नव्या ऋतूची चाहूल लागू लागते. आता पाऊस येणार असे सांगणारे जसे निसर्गाचे संकेत आहेत तसेच कोकणातील आठवडी बाजारामध्ये मसाले, पापड, फेण्या, लोणची आणि सुक्या मच्छीचा घमघमाट सुटला आणि अनेक महिला हातात भल्यामोठ्या पिशव्या घेऊन बाजारात दिसू लागल्या की, तेव्हाही जाणवते ऋतू बदलणार आहे. बाजारातली ही लगबग आगोटची आहे. हीच ऋतू बदलाची चाहूल कोकणातील अनेक बाजारांमधून लागू लागली आहे.

हल्ली जरा कडक पडत असली तरीही कोकणाला थंडीचे फारसे अप्रूप नाहीच. ते अगदी फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंतच इथे थंडी रेंगाळते. कोकणात अनुभवायचा तो मुसळधार सरींचा पावसाळा आणि कडक उन्हाचा उन्हाळा! दोन्ही ऋतू माणूस म्हणून कोकणी माणसाला भरभरून देतच असतात. उन्हाळा तर कोकणात वसंतच घेऊन येतो. हिवाळ्यातल्या आंब्याच्या मोहोराचा दरवळ उन्हाळ्यामध्ये पिकलेल्या आंब्याच्या घमघमाटात बदललेला असतो. काजूची बाग फुललेली असते. कोकणातील शहरी भागापासून लांब जसजसे गावामध्ये पोहोचलं की, मग इथे केवळ आंबा, काजूच नाही तर तोरणे, कोकम, करवंदासारखी अनेक चवदार फळे चाखायला मिळतात. तोच जसजसा उन्हाळा उग्र होत जातो तसतशी गुलमोहरापासून बहवापर्यंत अनेक फुले रांगोळी घातल्यासारखी सगळीकडे दिसू लागतात. गुलमोहर, बहावा, पांगिरा, आईन, चाफा, मोगरा, रातराणी, बोगनवेल, मधुमालती अशी कितीतरी फुलझाडे जागोजागी दिसतात आणि मन प्रसन्न करत असतात.

फळाफुलांचा हा बहर अवघा परिसर आपल्या कवेत घेत नाहीत तोच रोहिणी नक्षत्र डोकावू लागते आणि शेतकऱ्यांची लगबग वाढते. भाजावळीने शेतजमीन तापू लागते. उष्मा सहन करण्यापलीकडे जातो आणि मग अचानक ढग भरून येतात आणि वळवाचा एखाद दुसरी सर वातावरणाचा आणि माणसाचाही मूड बदलून टाकते. मात्र हेच संकेत ऋतू बदलाचेही असतात. कोकणातला पाऊस कधी कधी घराबाहेरही पडायला देत नाही, त्यामुळे सगळेच जण किमान चार महिन्यांच्या बेगमीला लागतात. छोटे-छोटे प्राणी, पक्षी पावसाच्या तयारीला लागतात. शेतकरी शेतजमिनीच्या मशागतीकडे वळतात आणि गावागावांतील छोटे-छोटे बाजार जत्रेसारखे फुलू लागतात. याच बाजारात हळद, मसाले, कांदे, बटाटे, पापड, फेण्या तांदूळ, गुळ सगळे कोरडे पदार्थ भरले जातात. पावसाळ्यात किमान दोन महिने मच्छीमारी बंद राहणार म्हणजे ताजे मासे मिळणार नाही म्हणून सुक्या मासळीची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. काड, बोंबील, खारवलेले मासे असे सुक्या मासळीचे एक ना अनेक प्रकार बघायला मिळतात. हा बाजार करायला आणि पावसाळी बेगमी करायला घरातल्या गृहिणींबरोबरच मुंबईचे चाकरमानी मोठी गर्दी करत असतात.

आताही निसर्ग ऋतूबदलाचे संकेत देत आहे, वळिवाच्या सरी काही काळ वैशाखात श्रावणाची आठवण करून देत आहेत आणि हाच इशारा समजून गावोगावी आगोटची लगबग सुरू झाली आहे. अर्थात गेल्या काही वर्षांत कोकणातील अर्थकारणात अनेक तऱ्हेने बदल झाला आहे. अर्थात बदल हा स्वाभाविकच आहे. हा बदल अशा छोट्या-छोट्या आठवडी बाजारांमध्येही दिसून येतोय. महागाई वाढ हा जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. पण फक्त वाढणाऱ्या महागाईचा सामना करताना इथली उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे, नवनवीन संधी मिळणे आवश्यक आहे, मनिऑर्डर पद्धत बंद होऊन स्वयंविकासाकडे इथल्या प्रत्येक माणसाचा कल होणे आवश्यक आहे. या बाजारपेठ या इथल्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख स्रोत आहेत. विक्रेता आणि ग्राहक यांची ही उत्तम साखळी आहे. हे दोघेही इथे समाधानी असले पाहिजेत, तरच अर्थव्यवस्थेतील तोल सांभाळला जाईल. यासाठी चांगले आणि सकारात्मक बदल घडले पाहिजेत. येणाऱ्या संधीकडे विरोध म्हणून न बघता विकासाची वाट म्हणून बघितले पाहिजे, तरच इथले जीवनमान बदलेल आणि इथल्या आठवडी बाजारातली आगोटची लगबग अधिक जोमाने होईल. यासाठीच नव्या ऋतूबदलाच्या चाहुलीप्रमाणेच सकारात्मक विचारांच्या बदलाची चाहूल आता लागली पाहिजे!

Recent Posts

Rahul Gandhi: “बेजबाबदार वक्तव्य करू नका”, सावरकर यांच्यावरील टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त (Rahul Gandhi Controversial Statement on Savarkar)…

9 minutes ago

इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे बंगळुरूत निधन

बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…

18 minutes ago

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…

1 hour ago

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

2 hours ago

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…

2 hours ago

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…

3 hours ago