Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरे ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी घेणार का?

उद्धव ठाकरे ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी घेणार का?

मुंबईतील बोगस शाळांबाबत आमदार नितेश राणे यांचा सवाल

मुंबई (वार्ताहर) : भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील अनधिकृत शाळांच्या मुद्द्यावरून राज्य सरकावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र लिहिले आहे. “शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, मुंबईत शिक्षणाच्या नावाखाली प्रशासनाला हाताशी धरून टक्केवारीसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे वाटोळं करण्याचा जणू काही महापालिकेतील अधिकाऱ्यांनी विडाच उचललेला दिसतोय.

पालिकेची मान्यता न घेता मुंबईत १६९ अनधिकृत शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे”. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी ते घेणार आहेत का? “शाळाच बेकायदेशीर असतील, तर या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रताच धोक्यात येणार नाही का? अशा शाळांवर सोयीस्कररीत्या कारवाई टाळली का जाते?” असा सवाल नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विचारला आहे.

“मुंबई महापालिकेचे कौतुक उद्धव ठाकरे नेहमीच करतात. कधी जागतिक आरोग्य संघटनेचा दाखला देतात. कधी मुंबई पॅटर्नचा गवगवा करतात. पण याच मुंबई पॅटर्नमध्ये २६९ अनधिकृत शाळा येतात का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचाय”, असे नितेश राणे त्यांच्या व्हिडीओ संदेशात म्हणाले आहेत.

“आजपर्यंत आपण अनधिकृत दुकाने, बांधकाम, रस्ते ऐकले, पण मुंबई पॅटर्न अंतर्गत अनधिकृत शाळा या नेमक्या कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? या विद्यार्थ्यांचे भविष्य कुणाच्या हातात आहे? पालकांना तरी याची माहिती दिली आहे का? या सगळ्याबद्दल उद्धव ठाकरे भूमिका घेणार आहेत का? या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची गॅरंटी ते घेणार आहेत का? त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल”, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -