
डॉ. मिलिंद घारपुरे
दोन दिवसांतल्या तीन घटना!! कार सर्व्हिसिंगला टाकलेली. मेकॅनिक... “साहेब क्लचप्लेट बदलून घ्या फक्त ५०००” “का रे काही प्रॉब्लेम, कितीला?” मी. “नाही... तशी चांगलीये, पण सात वर्षे झाली गाडीला. लाँग ड्राइव्हला वाटेत काही झालं तर... उगाच रिस्क कशाला” दुपारी जरा टर्म इन्शुरन्सची चौकशी करत होतो. कमी अधिक फरकाने प्रत्येक एजंट... “सर ५० लाखाचा टर्म इन्शुरन्स एवढा एवढा हप्ता. मेडिकल आणि एक्सिडेंट रायडर तेवढा घेऊन टाका.” पण कशाला उगाच? मी..! “सर फक्त २५० दर महिनामध्ये डबल कव्हर म्हणजे डबल बेनिफिट. यु आर ४५+ उगाच रिस्क कशाला.” (मी गेलो, तर मलाच बेनिफिट कसा हे सांगायला तेवढं जरासं तो विसरला.) मी... ही ही ही तो ... ह्याँ ह्याँ ह्याँ... सोसायटीतले एक सीनिअर सिटिझन...“जरा येतोस का रे माझ्याबरोबर उद्या. जरा बीपी वाढतंय माझं. स्ट्रेस टेस्ट आणि टू डी इको करायच आहे.” “पण का...? काही त्रास आहे का?” “अरे ही इज गुड कॉर्डियोलोजिस्ट. रूटिन चेकअपला गेलो होतो. म्हणला, पन्नाशी झाली तुमची, करून घ्या. उगाच रिस्क कशाला.” आवश्यक आणि अत्यावश्यक...
कुठं आणि कितीसं? आवश्यकतेत थोsssssssssडी भीती मिसळा, झालं की “अत्यावश्यक”!!! विचार करत होतो, लिहून पोष्टू का नको... म्हणलं पोष्टून टाकू... “उगाच रिस्क कशाला.”