अरविंद विठ्ठल कुळकर्णी
पवार अडचणीत आले की, सगळा महाराष्ट्र अस्वस्थ होतो. अशी त्यांची किमया आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी एका प्रगट सभेत पवारांवर बोलत असताना ते नास्तिक असल्याचा उल्लेख केला. ते पवारांना लागले. त्यांनी एकामागून एक स्पष्टीकरणे दिली आणि आपण देवळात जातो, हात जोडतो, नारळ फोडतो अशी माहिती दिली. अनेकांना थोडासा धक्का बसला. कारण पवार पुरोगामी आहेत अशी त्यांची प्रतिमा आहे. पुरोगामित्वाची एक खूण म्हणून ते नास्तिक आहेत, असे आवर्जून सांगितले जायचे. महाराष्ट्रातले विचारवंत, साहित्यिक, व्यावसायिक आणि अनेक क्षेत्रांतील अनेक नामवंत लोक त्यांच्याविषयी अत्यंत आदराने बोलत असतात, वागत असतात. त्यांना ‘जाणता राजा’ म्हणतात. अशा एक प्रकारे वंदनीय नेत्याला बचावात्मक भूमिका घ्यावी लागावी आणि आपण नास्तिक नसून आस्तिक असल्याची विगतवार माहिती पुरवावी लागावी यावरून शेक्सपिअरला जसा डेन्मार्क नगरीत काहीतरी कुजले असल्याची घाण आली, तसे महाराष्ट्राचे काहीतरी निश्चितपणे बिघडले आहे, अशी शंका माझ्या मनात आली.
पवारांच्या मंत्रिपदाच्या अनेक शपथविधींना मी उपस्थित राहिलो आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी बहुसंख्य मंत्री घेतात त्याप्रमाणे ‘ईश्वराला स्मरून’ नव्हे, तर ‘गांभीर्यपूर्वक’ असा शब्दप्रयोग करून शपथ घेतल्याचे मला आठवले. मग पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या या आधुनिक आर्य चाणक्याला सहस्रचंद्रदर्शन झाल्याची अवस्था पार केल्यानंतर आपण आस्तिक असल्याचे महाराष्ट्र देशाने मानावे, असे का वाटू लागले असावे? मी आठवतील तेवढे समाजसुधारक आठवून पाहिले. बहुतेक सगळे आस्तिक निघाले. अपवाद दोघांचा. सावरकर आणि आंबेडकर. धनंजय कीरांचे वाक्य आठवले. ते असे की, ‘बहुतेक समाजसुधारकांना हिंदू धर्म जो आहे, त्यातील अनिष्ट प्रथा नष्ट करून काही सुधारणा करायच्या आहेत. सावरकर आणि आंबेडकर यांना मात्र धर्मग्रंथांचे शब्दप्रामाण्यच नाहीसे करायचे आहे आणि बुद्धिप्रामाण्य मानणारा नवा धर्म स्थापन करायचा आहे म्हणून हे दोघे नुसते समाजसुधारक नाहीत, तर ते समाजक्रांतिकारक आहेत.’
पण सावरकरांची प्रतिमा तर प्रतिगामी, जातीय, धर्मातिरेकी, सामाजिक एकतेच्या विरुद्ध आणि मुसलमानद्वेष्टे अशी प्रयत्नपूर्वक जोपासण्यात आली आहे. मी विचारात पडलो असताना कवी कुसुमाग्रज समोर उभे राहिले. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीत सावरकरांच्या निधनानिमित्त झालेल्या शोकसभेत दोन मिनिटे उभे राहून मौन पाळीत असताना कुसुमाग्रजांनी स्वतःला प्रश्न विचारला की, ‘एकदा तरी आपण म्हणजे महाराष्ट्राने कसलाही विकल्प मनात न आणता सावरकरांना मन:पूर्वक नमस्कार केला आहे का, त्यांच्या थोरवीपुढे तो नतमस्तक झाला आहे का?’ आणि त्याचे उत्तर नकारार्थी आल्यावर त्याची त्यांना लाज वाटली.
मी सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध पुन्हा वाचले. त्यांच्या मते एकही धर्मग्रंथ देवाने निर्मिलेला नाही. त्यामुळे तो कालबाह्य झाला असल्यास टाकला पाहिजे आणि नवा धर्म बुद्धिवादाच्या पायावर उभारला पाहिजे. नव्या धर्मासाठी तीन कसोट्या ते सांगतात. आजची परिस्थिती, मनुष्याचे ऐहिक हित आणि वैज्ञानिक दृष्टी हा पाया पाहिजे. श्रुतिस्मृतिपुराणोक्त काही नको. सगळे अद्यतन हवे. स्वातंत्र्य,समता आणि बंधुत्व या तत्त्वत्रयीवर सावरकर आणि आंबेडकर या दोघांना नवा धर्म स्थापायचा आहे. त्यांना वर्णव्यवस्था नको आहे. ते गांधींपेक्षा वेगळे आहेत. सावरकर सांगतात की, युरोपने धर्मग्रंथ गुंडाळला आणि विज्ञानाची कास धरली. त्यानंतर तो चारशे वर्षांत चार हजार वर्षे पुढे गेला. धर्मग्रंथ काल काय झाले ते सांगतात. आज काय हवे ते विज्ञानाला विचारा. सर्व धर्ममते ही मानवजातीची सामायिक मालमत्ता समजावी. विज्ञानाच्या कसोटीवर उतरेल ती ठेवावी. बाकीची नष्ट करावी हाच मनुष्यधर्म आहे, असे सावरकर आणि आंबेडकर दोघेही सांगतात.
सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ असे संबोधिले जाते. त्यांना भारताचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीच्या आत्मिक, नैतिक आणि ऐहिक स्वातंत्र्यासाठी हवे होते. बहुमताच्या विरुद्ध अल्पसंख्यांकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, असे ते मानीत होते. ते विज्ञान म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ सायन्स असा न घेता रिझन असा घेतला पाहिजे. त्यांना माणसाचे मन आधुनिक बनायला पाहिजे होते. प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगनिष्ठ विज्ञान हा त्यांना नव्या धर्माचा पाया असायला हवा होता. भारताचे संविधान मनुस्मृती, कुराण व बायबलवर आधारित नसावे, तर त्याची आधारशीला बुद्धिप्रामाण्यवाद असावी, असे सावरकरांनी १९५० मध्ये सांगितले होते.
जिज्ञासूंनी त्यांचे ‘मनुष्याचा धर्म आणि विश्वाचा धर्म’, ‘भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय’ आणि ‘खरा सनातन धर्म कोणता’ हे तीन विज्ञाननिष्ठ निबंध वाचावे. माणसाने आपल्याला केंद्रबिंदू समजून सृष्टीचा विचार करू नये. आपण मोहरीच्या दाण्याएवढेही नाही. आपल्याला पाणी मिळावे म्हणून नदी वाहत नाही. नदी वाहते म्हणून आपल्या पाणी मिळते. सृष्टीचे नियम समजून आपले जीवन सुखी करण्यासाठी प्रयोगशील राहावे. तुमची बाजू सत्याची असली तरी सत्याचा विजय होण्यासाठी भौतिकदृष्ट्या तुम्ही सामर्थ्यसंपन्न असले पाहिजे, असा प्रयत्नवाद त्यांनी सदोदित सांगितला. सावरकरांच्या हिंदुत्वात हिंदू धर्म फार थोडा आहे. हिंदुत्वाचे इंग्रजीत भाषांतर हिन्दुनेस करा, हिंदुइझम करू नका, असे त्यांनी सांगितले आहे. पण ते मोठमोठ्या वकिलांनीही अजून लक्षात घेतलेले नाही. सावरकर सोयीनुसार आस्तिक-नास्तिक नसतात. ते राष्ट्राचे आणि त्यातील जनतेचे सुख प्रथम पाहतात. त्यांना प्रत्येक भारतीयांचे मन आधुनिक बनायला हवे आहे. जीवनशैली श्रुतिस्मृतिपुराणोक्त नाही, तर अद्यतन हवी आहे.