नवी मुंबई (प्रतिनिधी) : २१व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालणारा सायन्स पार्क हा सेक्टर १९ नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये उभारला जात असून तो पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र ठरणार आहे.
वंडर्स पार्कमधील मोकळ्या भागात १९५०० चौ.मी.च्या बांधकाम क्षेत्रात सायन्स पार्कचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात असून त्याच्या बांधकामाच्या सद्यस्थितीची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सद्यस्थितीत त्या ठिकाणी प्लिंथपर्यंतचे काम झाले असून कामाची पाहणी करताना मनुष्यबळात वाढ करून कामाला अधिक वेग देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
पावसाळी कालावधीतकरिता येऊ शकतील अशी कामे सुरू ठेवावीत व नियोजित कालावधीत बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध काम करावे, असेही आयुक्तांनी निर्देश दिले. या सायन्स पार्कमध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान विविध मॉडेल्स, प्रकल्प, थ्रीडी इमेजेस, ऑडिओ-व्हीडिओ अशा विविध माध्यमांतून मांडले जाणार असून याद्वारे विज्ञानाची माहिती आकर्षित करेल, अशा पद्धतीने साकारण्यात येणार आहे. याद्वारे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असून नागरिकांसाठीही नावीन्यपूर्ण सुविधा मनोरंजक साधनांसह उपलब्ध होणार आहे.
सायन्स पार्कमध्ये प्रदर्शित करण्यात येणाऱ्या विविध बाबी, सुविधा, प्रकल्प उपलब्ध करून देताना भारतातील अशा प्रकारच्या सायन्स पार्कचा बारकाईने अभ्यास करावा व इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, असे आगळे-वेगळे प्रकल्प, मॉडेल्स या ठिकाणी उपलब्ध असतील अशा प्रकारे जागतिक पातळीवर शोध घ्यावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे व गिरीश गुमास्ते आणि इतर अभियंते उपस्थित होते.