Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

कोरोना रुग्णवाढ कायम राहिली तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता

कोरोना रुग्णवाढ कायम राहिली तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता

मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे १ हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची आवश्यकता असेल, असे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.


मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण हळूहळू वाढत आहेत. गुरुवारी, २६ मे रोजी राज्यात ५०० हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली. मुंबईत ३५० चा टप्पा ओलांडल्याने कोरोना रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात चौथी लाट येऊ शकते, असे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन, महापालिकेने आधीच सांगितले आहे की त्यांच्या सर्व जंबो कोविड-१९ सुविधा किमान सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत.


“ज्या पद्धतीने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्बंध आणावे लागतील. विमानसेवेमध्ये अद्याप निर्बंध कायम आहेत. लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या १० कोटी लोकसंख्येपैकी केवळ ७० टक्के लोकांनी आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अजूनही ३० टक्के लोकांना लस मिळालेली नाही. अलीकडील अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, कोरोनाची तीव्रता रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. यानंतरही अनेकजण लसीकरणात रस घेत नाहीत.


१६ जानेवारी २०२१ पासून राज्यात लसीकरण सुरू झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फ्रन्टलाईन वर्कर, ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांपासून १२ वर्षांच्या बालकांची लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्यात ४५ पेक्षा जास्त वय असलेल्यांच्या गटातील सर्वाधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली.

Comments
Add Comment