Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

आता हनुमानाच्या जन्मस्थळावरून वादंग

आता हनुमानाच्या जन्मस्थळावरून वादंग

त्रंबकेश्वर : हनुमानाचे जन्म ठिकाण निश्चित कोणते? यावरून आता वादंग सुरू झाला असून कर्नाटकातील किश्किंद येथील मठाधिपतींनी नाशिकमध्ये येऊन अंजनेरी येथील साधू-महंत यांना आव्हान दिले आहे. त्यासाठी आता येत्या मंगळवारी नाशिकमध्ये धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील किश्किंद येथील हनुमान मठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती महाराज हे शनिवारी नाशिकमध्ये दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी हे हनुमानाचे जन्म ठिकाण नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे नाशिक व त्रंबकेश्वरमधील साधू-महंतांना जर अंजनेरी हे हनुमानाचे जन्म ठिकाण वाटत असेल तर त्याबाबतची इतिहास कालीन कागदपत्रे किंवा पुरावा हा ३१ तारखेला म्हणजे मंगळवारी होणाऱ्या धर्मसभेमध्ये सादर करावा असे खुले आव्हान दिले आहे.


याबाबत धर्मसभा नाशिक रोड या परिसरात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, दुसरीकडे हनुमान पिठाचे गोविंदानंद सरस्वती यांनी जे खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंत हे संतप्त झाले आहेत. यातून काही मार्ग निघावा म्हणून अनिकेत शास्त्री जोशी हे प्रयत्न करीत आहेत. परंतु शनिवारी संध्याकाळपर्यंत तरी यात कोणताही मार्ग निघालेला नव्हता. यावरून मात्र नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून कर्नाटकातील हनुमान पीठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment