डोंबिवली : रिक्षा आणि मोटार सायकल चोरून त्या विकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका आरोपीस मानपाडा पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून एकूण ५ रिक्षा आणि ५ मोटार सायकल असा एकूण ५ लाख ३ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे.
डोंबिवली पूर्व विभाग कांचनगाव येथे वास्तव्य करणारा आकाश ढोणे (१९) असे आरोपीचे नाव आहे. मानपाडा पोलिसांतर्फे तयार करण्यात आलेल्या पथकांनी ज्या भागातून मोटार वाहने चोरी झालेली आहेत त्या भागात गस्त घालून संशयित इसमावर पाळत ठेवली होती. त्यानुसार संशयित आरोपी आकाश पोलिसांच्या नजरेस पडला.
चोरलेल्या रिक्षा व मोटारसायकली त्याने डोंबिवली पूर्व येथील निळजे गाव परिसरातील माऊली तलावाच्या बाजूस असलेल्या झाडाझुडपात तसेच डोंबिवली पूर्व परिसरातील खंबाळपाडा मॉडेल कॉलेजच्या मैदानातील झाडाझुडपात लपवून ठेवल्या असल्याचे कळून आले.
या सर्व रिक्षा व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे आणि मानपाडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली