पुढच्या वर्षीपासून सीईटी, १२ वीच्या गुणांना मिळणार महत्व
मुंबई (प्रतिनिधी) : ‘ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा हा विद्यार्थ्यांचा सध्याचा सगळ्यात जवळचा प्रश्न आहे. आता आपल्याला ऑनलाइनकडून ऑफलाइनकडे जायचे आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील या निर्णयाला संमती दिली आहे. त्यामुळे आता यापुढे राज्यात ऑफलाइन परीक्षाच होणार’, अशी माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
उदय सामंत म्हणाले, ‘ऑफलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली आहे. आपण अभ्यास कितपत करू शकतो, असा विद्यार्थांच्या मनात न्यूनगंड होता. त्यामुळे त्यांना परीक्षेआधी प्रश्नावली देण्याचा प्रयत्न केला आहे’.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. १२ वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची असते. त्यामुळे ते १२ वीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीपासून आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेत आहोत. या आधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हा प्रयोग झालेला होता. आता हा प्रयोग पुन्हा करणार आहोत. मेरिटसाठी १२ वी आणि सीईटीचे ५० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढच्या वर्षीपासून सीईटी आणि १२ वीच्या गुणांना महत्त्व देण्यात येणार आहे.
निकाल लवकर लावण्याकडे लक्ष…
आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे विद्यापीठांना सांगण्यात आले आहे. तसेच निकालदेखील लवकरात लवकर लागावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करणे आमची जबाबदारी आहे.
देशातील अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम मराठीत सुरू केला आहे. इंजिनीअरिंगचा मराठी भाषेतला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे स्वीकारला आहे. पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरला सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगतले.