मुंबई (प्रतिनिधी) : क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारद्वारे ‘शस्त्र’ हे भ्रमणध्वनी आधारित वैशिष्ट्यपूर्ण ‘अँड्रॉइड ॲप’ केंद्र सरकारच्या संबंधित विभागाद्वारे तयार करण्यात आले आहे. या ‘अँड्रॉइड ॲप’चे वैशिष्ट्य म्हणजे या ॲपद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांचा आवाज व खोकण्याचे ‘रेकॉर्डिंग’ केले जाते.
‘रेकॉर्ड’ करण्यात आलेल्या या आवाजाचे व खोकण्याचे विश्लेषण हे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ आधारित अत्याधुनिक प्रणालींच्या आधारे करण्यात येते. ज्याद्वारे क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक स्तरावरील निदान होणार आहे. या विश्लेषणाच्या आधारे ज्यांना क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक निदान झाले आहे, अशा व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करून बाधा झाल्याबाबतचे अंतिम निदान केले जाते, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर गोमारे यांनी सांगितले की, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मुंबई पालिका क्षेत्रात ५६४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून यापैकी सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी या अँड्रॉइड ॲप आधारित प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. सध्या या प्रक्रियेत केवळ क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून पुढील टप्प्यात आरोग्य खात्यातील इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश या आधारित चाचणीमध्ये करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या अत्याधुनिक अँड्रॉइड ॲपमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात न जाता देखील क्षयरोग विषयी प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार आहे. या चाचणीमुळे लवकर निदान झाल्याने वेळीच उपचार करणे शक्य होईल, असे मुंबई पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.