मुंबई : तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दानपेटीच्या लिलावातील भ्रष्टाचारासंदर्भातील सीआयडी अहवाल प्रकरणी मी अधिका-यांकडून माहिती घेतो. तसेच याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, असे आश्वासन या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या दानपेटीतील भ्रष्टाचाराप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट आणि सतीश सोनार यांची शंभूराज देसाई यांची भेट घेऊन दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी देसाई यांनी वरील आश्वासन दिले. याविषयीचे निवेदनही या वेळी समितीच्या वतीने शंभूराज देसाई यांना देण्यात आले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दानपेटीच्या लिलावातील भ्रष्टाचाराची सरकारने विशेष अन्वेषण यंत्रणेद्वारे (सी.आय.डी.) चौकशी लावली होती. विशेष अन्वेषण यंत्रणेने हा चौकशीचा अहवाल वर्ष २०१७ मध्ये सरकारला सादर केला आहे; मात्र अहवाल सादर करून ५ वर्षे झाली तरी दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही.