Sunday, July 21, 2024
Homeमहामुंबईराणी बागेतील नव्या पाहुण्यांची पर्यटकांना भुरळ

राणी बागेतील नव्या पाहुण्यांची पर्यटकांना भुरळ

सुट्टीच्या दिवशी पर्यटक संख्या २५ हजारांच्या पुढे

सीमा दाते

मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सध्या नवीन पाहुणे आले आहेत. या पाहुण्यांमुळे राणी बागेत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या प्राण्यांना पाहण्यासाठी दररोज सरासरी १३ हजार पर्यटक उद्यानात येतात, तर सुट्ट्यांच्या दिवशी ही संख्या २५ हजारांच्या पुढे जात आहे. कोरोना काळात गेली दीड वर्षे राणी बाग बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर उद्यानात अनेक बदल करण्यात आले आहेत. पिंजरे, पाण्याची व्यवस्था, प्राणी आणि पक्ष्यांना विहार करण्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आल्या आहेत.

सध्या उद्यानात शिवा नावाचा अस्वल आणि अर्जुन नावाचा बिबट्या व त्याची मादी या नव्या पाहुण्यांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. यापूर्वी सोमवार ते शुक्रवार सुमारे चार हजार पर्यटक राणीबाग पाहण्यासाठी येत होते. आता ही संख्या सरासरी १३ हजारांच्या वर गेली आहे. सध्या शनिवारी आणि रविवारी २५ हजारांहून अधिक पर्यटक उद्यानाला भेट देत आहेत. उद्यानामध्ये झालेले आधुनिक बदल आणि नवीन पाहुण्यांचे आगमन यामुळे पर्यटकांची संख्या वाढली असल्याची माहिती उद्यान अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

उद्यानात नवीन प्राण्यांसोबत पेंग्विन, बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या, वाघ पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. प्राण्यांसोबत पक्ष्यांसाठी देखील अत्याधुनिक पिंजरे उभारले आहेत. रॉयल बंगाल वाघांची जोडी आणि पेंग्विन्स पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

प्राणिसंग्रहालयात एकूण १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी व ७ जातींचे ३२ सरपटणारे तसेच जलचर प्राणी असे एकूण २७३ प्राणी/पक्षी आहेत. विविध ३० प्रजातींचे सुमारे २५० पक्षी पर्यटकांना या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय २८६ प्रजातींचे सुमारे साडेतीन हजार झाडे, दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी अनेक वृक्षप्रेमी उद्यानात हजेरी लावतात. विशेषत: शनिवार व रविवारी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -