जकार्ता (वृत्तसंस्था) : भारताच्या हॉकी संघाने गुरुवारी कमाल करत इंडोनेशियाचा १६-० असा धुव्वा उडवला. या मोठ्या विजयामुळे भारताने पाकिस्तानला मागे टाकत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये प्रवेश केला.
भारताच्या हॉकी संघाने आशिया चषकातील आपल्या अखेरच्या पूल मॅचमध्ये इंडोनेशियाचा १६-० ने पराभव करून सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला. जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया २०२३ च्या विश्व चषकासाठी पात्र ठरलेत. तर यजमान म्हणून भारतही यासाठी पात्र ठरला आहे.
सुरुवातीच्या सामन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघ या स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकला गेला होता. पण, पूल-एमध्ये जपानने पाकला ३-२ ने धूळ चारली. यामुळे भारतासाठी संधी निर्माण झाली. पहिल्या दोन्ही सामन्यांत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांत टीम इंडियाने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. त्याचा पाकसोबतचा पहिला सामना १-१ असा अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या सामन्यात जपानकडून ५-२ ने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.