Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखहेल्मेट सर पे, तो जान सलामत...

हेल्मेट सर पे, तो जान सलामत…

अखेर मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी बाईक चालवणाऱ्याला आणि मागे बसणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. यामध्ये विनाहेल्मेट बाईक किंवा स्कुटर चालवण्यास पाचशे रुपये दंड किंवा ३ महिने लायसन्स रद्द होऊ शकते, असे वाहतूक पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. खरं म्हणजे दुचाकींचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याप्रमाणेच मुंबईतही दुचाकींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. विशेषत: कोरोना महामारीनंतर दुचाकींच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे. कारण कोरोना काळात मुंबईत रेल्वे लोकल, बेस्ट बसेस यांच्या वाहतुकीवर निर्बंध होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी, तसेच वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक नोकरदारांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिलेले दिसले. आता कोरोना निर्बंध उठविण्यात आले आहेत. मात्र दुचाकींची वाढलेली संख्या कायम असून मुंबईतील अनेक रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीला बेजबाबदार दुचाकीस्वार कारणीभूत ठरले असल्याचे उघड झाले आहे. तसेच दुचाकीस्वारांमुळे अपघातांची संख्याही वाढलेली दिसत असून अपघातात प्राण गमावणाऱ्यांची संख्याही कैकपटीने वाढली असल्याचे उघड झाले आहे.

एखाद्या दुचाकी अपघातानंतर, मरण पावलेल्या व्यक्तींनी जर हेल्मेट घातले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते ही अत्यंत महत्त्वाची बाब नेहमीच अधोरेखित होते. पण सुस्साट वेगाच्या अंधप्रेमात आकंठ बुडालेले काही दुचाकीस्वार मात्र स्वत:च्याच मस्तीत हेल्मेट परिधान न करता व मागील सीटवर बसलेल्या सहप्रवाशालाही विनाहेल्मेट घेऊन प्रवासाला किंवा रपेट करण्यास बाहेर पडतात आणि रस्त्यातील एकाद्या खड्ड्यात किंवा एखादा अडथळा, दगड भरधाव दुचाकीच्या मार्गात आल्यास अपघात घडतो. यावेळी वेग जास्त असल्याने दुचाकीला आवर घालून ती वेळीच थांबविणे चालकाला अशक्य होते आणि एक नवा अपघात घडतो. यावेळी बाईकवर बसलेल्यांनी हेल्मेट परिधान केले नसेल, तर त्यांचा कपाळमोक्ष झालाच समजायचा किंवा डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्राण गमावण्याची वेळ आली म्हणायची. मुंबईत दुचाकीच्या अपघातांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हेल्मेट घातले नाही तरी फरक पडत नाही, असा समज करून कुणी वागत असेल तर सावधान! कारण, हेल्मेट न घालणे अनेकांच्या जीवावर बेतलेले आहे. गेल्या वर्षांत ३१० प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्या. हेल्मेट घातले असते, तर १०० पेक्षा अधिक मोटरसायकलस्वारांचा जीव वाचविता आला असता, अशी धक्कादायक माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे.

नुकत्याच हाती आलेल्या अकडेवारीवरून राज्यात घडलेल्या रस्ते अपघातांपैकी तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक अपघात हे मुंबईत घडल्याचे पुढे आले आहे. एकूण १९,३८३ अपघातांपैकी ८,७६८ अपघात हे एकट्या मुंबईत घडल्याचे जानेवारी ते एप्रिल २०२२ दरम्यानच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. कारवाईच्या भीतीपेक्षा स्वतःच्या जीवासाठी मोटरसायकलस्वाराने हेल्मेट घालावे, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येते. मात्र त्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करतातच. पण पोलीसही कालांतराने कारवाई करणे सोडतात, हेही चुकीचे आहे. या पार्श्वभूमीवर बाईकस्वारासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास बाईकस्वाराला ५०० रुपये दंड तसेच चालक परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांनी या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बाईकस्वारांना आणखी एका हेल्मेटची खरेदी करावी लागणार आहे. अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलत कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांनी यापूर्वी आयुक्तांच्या आदेशाने, विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या चालकांवर तसेच बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे विनाहेल्मेटवरील कारवाईचा वेगही वाढत असून दिवसाला १०० ते १५०० जणांवर कारवाई करण्यात येत आहे. ६ एप्रिल ते ७ मे दरम्यान ५६ हजार ४९८ गुन्हे नोंदवत ५ हजार ४४१ जणांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविले आहेत. आरटीओ विभागाकडून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी हेल्मेट न घालणारे व परवाना नसणाऱ्या विद्यार्थी वाहनचालकांना महाविद्यालयाचे ओळखपत्र न देण्यासाठी वाहतूक शाखेने सर्वच प्राचार्यांना पत्र लिहिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन प्राचार्यांनी वाहतूक शाखेला दिले होते. हेल्मेट सक्तीसाठी काही महाविद्यालयांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता; परंतु महाविद्यालयांची सक्ती व वाहतूक शाखेचे आदेश कधी पडद्याआड गेले कळलेच नाही. सक्ती न करणे अथवा कारवाई न करणे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते. ‘अब बच्चो की जान लोंगे क्या?’ असा संतप्त प्रश्न पालकवर्ग करीत आहे. टीव्हीत किंवा चित्रपटात आपण बाईकस्वार आणि त्या मागील व्यक्तीने हेल्मेट घातल्याचे पाहत असतो. शिखर धवनच्या एका जाहिरातीतही आपण तसे पाहिले आहे. पण आता ते प्रत्यक्षात होणार आहे. बाईकवर बसणाऱ्या प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे आहे. तो बाईक चालवत असेल किंवा बाईकच्या मागील सीटवर बसलेला असेल तरी बाईकवर बसणाऱ्या प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. आता बाईक किंवा स्कुटर रस्त्यावर काढताना हेल्मेट घरी विसरणे किंवा हेल्मेट घालण्याचा कंटाळा करणे महागात पडणार आहे. हे चालवणाऱ्यालाच नव्हे तर बाईकवर मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठीही आहे. मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे हेल्मेटविना बाईक चालवतात. यामध्ये बाईक चालवणाऱ्याच्या मागे बसलेली व्यक्ती हेल्मेटचा वापर करीत नाहीत. मात्र आता असे केल्यास मागच्या व्यक्तीची पावती फाडली जाणार आहे. म्हणूनच हेल्मेटसक्तीबाबत सक्तीपेक्षा लोकांमध्ये जागृती करणेही क्रमप्राप्त आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेषत: दुचाकीच्या अनेक आपघातांमध्ये हेल्मेट न घातल्याने दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागल्याचे कटू सत्य पुढे आले आहे. त्यामुळे दुचाकींचा वापर करा, पण त्याचबरोबर हेल्मेटचाही वापर करा आणि घातक अपघातांपासून स्वत:चे व मागे बसणाऱ्याचे प्राण वाचवा, असेच कळकळीचे आवाहन करायला हवे. कारण ‘सर सलामत तो पगडी पचास’, या म्हणीप्रमाणे ‘ हेल्मेट सर पे, तो जान सलामत’ असेच म्हणावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -