मुंबई (प्रतिनिधी) : बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना हक्काची मोफत घरे द्या अशी मागणी करीत उपोषणाला बसलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मागणीला समर्थन देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार या उपोषणात सहभागी झाले.
वरळीतील बीडीडी चाळीत अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने निवासस्थाने दिली त्याच पद्धतीने पोलिसांना मोफत निवासस्थाने द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर हे करीत असून त्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज त्यांनी नायगाव येथे लाक्षणिक उपोषण केले. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना घर घेण्यासाठी ५० लाख रुपये मोजावे लागणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. बीडीडी चाळीत राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची घरे दिली.
बीडीडी चाळीचे पुनर्वसन करताना अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना जो न्याय लावला तोच न्याय पोलीस कर्मचाऱ्यांना लावला गेला पाहिजे, असे कोळंबकर यांचे म्हणणे असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना हक्काची घरे देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने पोलिसांना हक्काची घरे द्यावीत, असेही कोळंबकर यांचे म्हणणे आहे. आज त्यांच्या उपोषणात सहभागी होताना आमदार अॅड. आशीष शेलार यांनी सांगितले की, या मागणीला भाजपाचे मुंबईतील तिन्ही खासदार विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार या सगळ्यांचा पाठिंबा असून पोलिसांसाठी जो संघर्ष कोळंबकर करीत आहेत त्या संघर्षात भाजप पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. ऐरवी शांत असणारे कालिदास कोळंबकर हे पोलीसांच्या घरासाठी मात्र विधानसभेत आक्रमक पवित्रा घेऊन लढले. त्यांनी ही लढाई जशी सभागृहात लढली तसेच ते आता रस्त्यावर ही लढत आहे. ही लढाई पोलीसांंसाठी आहे.
जे पोलीस कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम करीत होते त्यांच्यासाठी ही लढाई आहे. या उपोषणात पोलीस सहभागी झाले नाही त्यांनी कुठल्याही पक्षाच्या अशा व्यासपीठावर जाऊ ही नये, पण पोलिसांच्या पत्नी ज्या पद्धतीने यामध्ये सहभागी झाल्यात ती ताकद ठाकरे सरकारला अजून कळलेली नाही. हा इशारा आहे असे समजावे, असेही आमदार अॅड. आशीष शेलार म्हणाले.